झायलो कारमधून गोवंश तस्करी उघड
शिरखेड पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; आरोपी पसार

गोवंशाची निर्दयी वाहतूक उघड; 7 जनावरांची सुटका
अमरावती/22 नोव्हेंबर – मोशी-अमरावती मार्गावर कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच शिरखेड पोलिसांनी धाव घेत संशयित झायलो कारचा पाठलाग केला. पोलिसांच्या धडक कारवाईत वाहनातून 7 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. यामध्ये 1 जनावर मृतावस्थेत आढळले, तर उर्वरित जनावरे जखमी आणि त्रस्त असल्याचे समोर आले. वाहनातील जनावरांची सुटका करताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. मात्र, कारमधील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले.
पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून, त्यातून जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम तसेच गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. पोलिसांनी तस्करीसाठी वापरलेली झायलो कार जप्त केली असून, वाहनाची किंमत 5 लाख रुपये, तर सुटका केलेल्या जनावरांची किंमत 4 लाख रुपये, असा एकूण मुद्देमाल 9 लाख रुपये असल्याचे वृत्त आहे. ही कारवाई स. पो. नि. ईश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. अरविंद गावंडे, पो. का. अमित राऊत, पो. का. गिरीश जाधव आदींनी पार पाडली. पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू असून, या घटनेचा पुढील तपास शिरखेड पोलिस करीत आहेत.





