अंगणवाडी सेविका आणि आशा भगिनींचा यथोचित सन्मान

हक्काच्या भावाच्या पाठींब्यामुळे भगिनींमध्ये नवा उत्साह

खा. बळवंत वानखडे यांचा भव्य भाऊबीज सोहळा उत्साहात

अंजनगाव सुर्जी /22 नोव्हेंबर- अमरावती मतदारसंघाचे खा. बळवंत वानखडे यांच्या पुढाकाराने अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि मदतनीस भगिनींचा भव्य भाऊबीज मेळावा अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य व पोषण सेवा पोहोचवणार्‍या या भगिनींना साडी-चोळी देऊन सन्मानित करण्यात आले असून, गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे हक्काचा भाऊ पाठीशी असल्याची भावना भगिनींनी व्यक्त केली.
ग्रामीण आणि शहरी भागातील माता व बालकांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या भगिनींच्या कामाचे मोल जाणून खा. बळवंत वानखडे यांनी या स्नेहमिलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात केवळ औपचारिकता न राहता घरगुती आणि आपुलकीचे वातावरण पाहायला मिळाले. सणासुदीच्या दिवसांत राबणार्‍या या भगिनींच्या चेहर्‍यावर आनंद फुलवण्याचा हा प्रयत्न उपस्थितांची मने जिंकून गेला. या वेळी खा. बळवंत वानखडे यांच्या हस्ते उपस्थित सर्व भगिनींना साडी-चोळी आणि भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी अनेक भगिनींनी आपले मनोगत व्यक्त करत भावनांना वाट मोकळी करून दिली. खा. बळवंत वानखडे यांनी त्यांच्या आ. पदाच्या काळात आणि आता खा. पदाच्या काळात आमचे अनेक रखडलेले प्रश्न, कामे आणि अडीअडचणी प्राधान्याने सोडवल्या आहेत, अशा शब्दांत भगिनींनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. या सोहळ्यामुळे सर्व भगिनींमध्ये कामासाठी नवी ऊर्जा संचारली होती. या कार्यक्रमाला खा. बळवंत वानखडे मित्र परिवाराचे सदस्य, अंजनगाव सुर्जी तालुका काँग्रेस समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक तसेच अंजनगाव सुर्जी शहर आणि ग्रामीण भागातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

हक्काच्या भावाचे 10 वर्षांचे अतूट नाते
तळागाळातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणार्‍या भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी खा. बळवंत वानखडे गेल्या 10 वर्षांपासून हा भाऊबीज उपक्रम सातत्याने राबवत आहेत. या उपक्रमातून लोकप्रतिनिधी आणि मतदारसंघातील भगिनींमधील जिव्हाळ्याचे नाते अधिक घट्ट झाले आहे. अडीअडचणीच्या काळात हक्काचा भाऊ सोबत असल्याचा विश्वास या सोहळ्यामुळे या आरोग्यदूतांना मिळाला आहे.

Back to top button