चिखलदरा थंडीत पर्यटकांची पावले पुन्हा वळली
गुलाबी गारव्याने नंदनवन पुन्हा खुलले

थंडीच्या मोसमात स्थानिक मेव्याची रंगत वाढली
अमरावती/22 नोव्हेंबर – चिखलदरात गुलाबी थंडी वाढल्याने पर्यटकांची पावले पुन्हा वळू लागली असून, धुके, शेकोटी, सीताफळ व रबडीच्या चवीने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाने पाठ फिरवल्याने गेल्या काही काळात पर्यटकांची वर्दळ कमी झाली होती. त्यामुळे येथील अर्थव्यवस्थेला हवी तशी चालना मिळाली नव्हती. आता हिवाळ्याच्या या 2 महिन्यांवर पर्यटकांची मदार असून, वातावरणात चांगलाच गारवा आला आहे. गेल्या 2 दिवसांपासून थंडी वाढत असून, पहाटे 5 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान रस्ते, उद्याने आणि गावागावांत दाट धुक्याची चादर दिसते. घाटवळणावर साचलेले धुके, खोल दर्यातील गावांवर पसरलेले आवरण आणि गवताच्या पात्यांवर चमकणारे दवबिंदू यामुळे नंदनवनात वेगळीच मजा येते. थंडी वाढल्यास पुढच्या आठवड्याच्या सुट्टीत पर्यटकांची मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे रंग पाहण्यासाठी पर्यटक विविध पॉईंटवर गर्दी करतात. पर्यटक मक्याची कणसे, गरमागरम चहा, भजी आणि गावरान खाद्यपदार्थांवर ताव मारत आहेत. रानावनातील सीताफळ संपण्याच्या मार्गावर असून, काही प्रमाणात पेरूही उपलब्ध आहेत. स्ट्रॉबेरीचे स्टॉल लवकरच रस्त्याच्या कडेला लागणार आहेत. खवा आणि रबडीची चव आता थंडीत खुलून आली आहे. किमान तापमानात घट झाल्याने सकाळ-संध्याकाळ चांगलाच गारठा जाणवत आहे.
थंडीची ऊब अन् गावरान चवीची रंगत
चिखलदरा परिसरात थंडीचा कडाका वाढू लागल्याने नागरिक शेकोट्या पेटवून ऊब घेत आहेत. पहाटे 5 ते 5.30 वाजता दाट धुके पडत असून, वातावरणात गारवा जाणवतो. पर्यटक मक्याची कणसे, गरमागरम चहा, भजी, सीताफळ, पेरू आणि रबडीचा मनमुराद आस्वाद घेत आहेत. पुढच्या आठवड्याच्या सुट्टीत पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असून, स्ट्रॉबेरीचा हंगामही लवकरच सुरू होणार आहे.





