कुर्‍हा-अंजनवती रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडांचे अतिक्रमण

वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास

संबंधित विभागाने तातडीने झाडे हटविण्याची नागरिकांची मागणी

कुर्‍हा /22 नोव्हेंबर: कुर्‍हा ते अंजनवती मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटेरी झाडांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, या झाडांच्या फांद्या थेट रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला वाढलेल्या या काटेरी झुडपांमुळे रस्त्याची रुंदी कमी झाल्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली असून, वाहनचालकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांना या काटेरी फांद्यांचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. समोरून मोठे वाहन आल्यास बाजू देताना रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी झाडांच्या फांद्या अंगाला लागण्याची तसेच वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करताना काटेरी फांद्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, दुचाकीस्वार तसेच इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा परिस्थितीत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेली काटेरी झाडे ही केवळ गैरसोय नसून वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न बनली आहे. मात्र, अद्याप संबंधित विभागाकडून या झाडांची छाटणी करण्याबाबत ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नाही.
संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा जबाबदार यंत्रणेने या समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेली काटेरी झाडे व झुडपे मुळापासून हटवून रस्ता मोकळा करावा, तसेच भविष्यात अशा प्रकारची समस्या निर्माण होऊ नये यासाठी नियमित देखभाल करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व वाहनधारकांकडून होत आहे.

Back to top button