वाढीव वीजबिलांमुळे धारणीतील नागरिकांना मोठा धक्का

अश्मिरा बानो यांचा महावितरणला थेट जाब

दोषी यंत्रांची चौकशी करण्याची मागणी

धारणी /22 नोव्हेंबर- शहरात अचानक अवाच्या सव्वा वीजबिले येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. या गंभीर प्रश्नावर नगरसेविका तथा स्वच्छता संवर्धन व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सदस्या अश्मिरा बानो शेख रफीक यांनी महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधले. पूर्वी 300 ते 400 रुपये येणारे वीजबिल आता थेट 2 हजार ते 6 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या वाढीव बिलांची आणि नवीन यंत्रांमधील तांत्रिक बिघाडाची तात्काळ चौकशी करावी अशी लेखी मागणी त्यांनी 19 नोव्हेंबर रोजी कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
धारणी शहरातील गोरगरीब आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांना गेल्या काही दिवसांपासून मोठा आर्थिक फटका बसत आहे. घरातील वीज वापर तेवढाच असतानाही बिलाचे आकडे मात्र गगनाला भिडले आहेत. याप्रकरणी नगरसेविका अश्मिरा बानो शेख रफीक यांनी धारणी येथील महावितरण कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांना धारेवर धरले.
चुकीच्या पद्धतीने घेतलेली वीज मोजणी तात्काळ दुरुस्त करावी. ज्या ग्राहकांची बिले अवाजवी आली आहेत त्यांच्या घरातील यंत्रांची तपासणी करून तिथे दुसरे तपासणी यंत्र बसवावे अशी मागणी त्यांनी केली. वीज वापरानुसार योग्य बिल भरण्यास नागरिकांची पूर्ण तयारी आहे. मात्र बिलांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता असणे गरजेचे असल्याचे मत अश्मिरा बानो यांनी मांडले.

नवीन यंत्रांबाबत नियमांचे पालन करावे
नवीन वीज मोजणी यंत्रे बसवताना महावितरणने सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही ग्राहकावर यंत्र बसवण्यासाठी जबरदस्ती किंवा दबाव आणू नये. जोपर्यंत वाढीव बिलांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत नियमानुसार वादग्रस्त बिलांमध्ये ग्राहकांना तात्काळ दिलासा द्यावा. अन्यथा धारणीतील नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने महावितरण विरोधात आंदोलन छेडले जाईल असा इशारा अश्मिरा बानो यांनी दिला आहे.

Back to top button