शेतकर्‍यांची कर्जमाफीच्या नावाखाली थट्टा

आगामी निवडणुकीत जनता सरकारला जागा दाखवेल

बबलू देशमुख यांचा सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल

अचलपूर युवक काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा

अचलपूर/22 नोव्हेंबर : पथ्रोट येथील बाबाजी फार्म हाऊस सभागृहात अचलपूर तालुका युवक काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यात अचलपूर तालुका युवक काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच तालुक्यातील विविध गावांमधील नवनियुक्त युवा पदाधिकार्‍यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करून संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली.
मेळाव्याला खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य वासंतीताई मंगरोळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले, संचालक अमोल चिमोटे, देवेंद्र पेटकर, श्रीधर काळे, अमेद्र वर्मा, शाहिद भाई, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव तनपुरे, अंजनगाव सुर्जीचे तालुकाध्यक्ष प्रमोद दाळु, अचलपूर शहर काँग्रेस अध्यक्ष राहुल गवई, दिनेश वानखडे, सच्चिदानंद बेलसरे, शेख अनिस, नगरसेवक गुड्डू भैया, राहुल गाठे, मामराज कडू, विशाल खानझोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, सरकारला आगामी निवडणुकांमध्ये पराभवाची भीती वाटत असल्याने दुष्काळी परिस्थितीचे कारण पुढे करून निवडणुका रोखण्याचे काम केले जात आहे. दुसरीकडे अनेक शेतकरी अद्याप कर्जमाफीपासून तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीपासून वंचित आहेत. प्रत्यक्षात शेतकर्‍यांना दिलासा मिळत नसताना कर्जमाफीचा मोठा गाजावाजा करून सरकार शेतकर्‍यांची थट्टा करीत आहे. सरकारच्या या धोरणांना आता जनता कंटाळली असून आगामी निवडणुकीत जनता सत्ताधार्‍यांना त्यांची जागा दाखवून देईल. काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मेळाव्याच्या माध्यमातून युवक काँग्रेसच्या संघटनात्मक विस्तारावर विशेष भर देण्यात आला. ग्रामीण भागातील युवकांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणून गावागावांत काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवून युवकांचे प्रश्न आणि शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.या भव्य मेळाव्याचे नियोजन व आयोजन अचलपूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत गोरले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गाठे यांनी केले, तर प्रास्ताविक प्रशांत गोरले यांनी मांडले. मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या मेळाव्यात तालुक्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर होऊन नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. ही संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. केवळ पदे स्वीकारून न थांबता प्रत्येक पदाधिकार्‍याने आपल्या गावात संघटनेचे काम वाढवावे, जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा, असे आवाहन खा. बळवंतराव वानखडे यांनी केले.

Back to top button