चिखलदरा वन प्रशिक्षण संस्थेत 53 नवनियुक्त वनरक्षकांचा दीक्षांत सोहळा

कराटे व धाडसी प्रात्यक्षिकांनी जिंकली उपस्थितांची मने

हीना बोजगार राज्यात प्रथम

चिखलदरा/22 नोव्हेंबर : महाराष्ट्र वन विभागाच्या येथील वन प्रशिक्षण संस्थेत वनरक्षकांच्या 64 व्या पायाभूत प्रशिक्षण सत्राचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. 25 मे ते 20 नोव्हेंबर 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यातील विविध वनविभागांतून आलेल्या 53 प्रशिक्षणार्थ्यांनी (37 पुरुष व 16 महिला) आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा चंद्रपूर वन अकादमीचे पदसिद्ध संचालक आर. एम. रामानुजम हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक निता कट्टे, गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक यशवंत बहाळे आणि मेळघाट वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी अनंता डिंगोळे उपस्थित होते.
मान्यवरांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर निरीक्षण वाहनाद्वारे परेडचे निरीक्षण करण्यात आले. यावेळी अमरावती पोलीस बँड पथकाच्या सुमधुर वादनाने सोहळ्यात विशेष रंगत आणली. शपथविधीनंतर प्रशिक्षणार्थ्यांनी सादर केलेल्या मैदानी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यात कराटेच्या माध्यमातून आत्मसंरक्षण कौशल्य, तसेच शारीरिक क्षमता, चपळता आणि सांघिक भावनेचे दर्शन घडवणारे धाडसी मनोरे व साहसी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
प्रशिक्षण कालावधीत क्रीडा व विविध विषयांत प्रावीण्य मिळवणार्‍या गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. अंतिम निकालानुसार हीना सलामत मुनीर बोजगार हिने 87.55 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. रोहित प्रमिला सिताराम वावरे (86.91 टक्के) याने द्वितीय, तर विनायक लक्ष्मी सुनील कणसे (86.64 टक्के) याने तृतीय क्रमांक मिळवला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल विनायक कणसे याला ’आदर्श प्रशिक्षणार्थी’ म्हणून सन्मानित करण्यात आले.वनसंवर्धनासाठी सज्ज होण्याचे आवाहन वनरक्षक म्हणून केवळ जंगलाचे रक्षणच नव्हे, तर वन्यजीव संरक्षण, जैवविविधता संवर्धन, वणवा नियंत्रण, वनगुन्हे प्रतिबंध आणि स्थानिक नागरिकांशी समन्वय साधणे ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्याचे मार्गदर्शन अध्यक्ष आर. एम. रामानुजम यांनी केले. संस्थेच्या संचालक मुक्ताबाई टेकाळे यांनी प्रास्ताविक व अहवाल वाचन केले. सूत्रसंचालन पल्लवी गुंठेवार, निकाल वाचन वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा मगरदे, तर आभार प्रदर्शन कवायत शिक्षक सुधीर आकेवार यांनी केले. सत्र संचालक प्राची उराडे यांच्यासह अभिरक्षक आर. जी. मुन, सहाय्यक अभियंता पी. पी. चौधरी, शिल्पा घाटे, महादेव धुर्वे, नितीन बघाये.

Back to top button