दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल

प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकर्‍यांना लवकरच दिलासा मिळणार

सह्याद्री सभागृहात आढावा बैठक

मुंबई /8 ऑक्टोबर  : राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक गुरुवारी (8 ऑक्टोबर) महाराष्ट्राच्या दौर्‍यावर दाखल झाले आहे. 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान होणार्‍या या चार दिवसीय दौर्‍यात केंद्रीय पथक राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन दुष्काळी परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, पिकांचे नुकसान आणि जनावरांच्या चार्‍याची स्थिती यांचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहे.
मुंबईत आगमन झाल्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांनी राज्यातील दुष्काळाची भीषणता केंद्रीय पथकासमोर मांडली.
टंचाई आणि मजुरांचे प्रश्न: पावसाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली पाणीटंचाई, टँकर्सची गरज, शेतमजुरांचे प्रश्न आणि संभाव्यस्थलांतर याकडे मुख्य सचिवांनी लक्ष वेधले.अल निनोचा फटका: मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद-सिंगल यांनी ’अल निनो’मुळे हवामानावर झालेला परिणाम आणि पिकांच्या नुकसानीची तांत्रिक आकडेवारी सादर केली.
जिल्हानिहाय पीक नुकसान: कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह आणि आयुक्त सुरज मांढरे यांनी जिल्हानिहाय पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती दिली.यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चार्‍याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन यांनी सध्या टँकरद्वारे सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याची माहिती दिली. तसेच पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी आगामी सात महिन्यांसाठी जनावरांच्या चार्‍याच्या आवश्यकतेचा आणि संभाव्य परिस्थितीचा आढावा केंद्रीय पथकासमोर मांडला.
11 ऑक्टोबरला मुंबईत होणार अंतिम चर्चा-राज्य सरकारने सादर केलेल्या माहितीच्या आणि पुराव्यांच्या आधारे केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष पाहणीसाठी जिल्हे आणि ठिकाणे निश्चित केली आहेत. केंद्रीय पथकातील अधिकारी विविध गटांमध्ये विभागून राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेटी देतील आणि स्थानिक अधिकारी व शेतकर्‍यांशी संवाद साधतील. प्रत्यक्ष पाहणी पूर्ण केल्यानंतर हे पथक मुंबईत परतणार असून 11 ऑक्टोबर रोजी दुष्काळी मदत आणि उपायांबाबत राज्य सरकारसोबत अंतिम सविस्तर चर्चा करणार आहे.

Back to top button