पुण्यातील मंदार किवळेच्या हत्येसाठी मारेकर्‍यांनी दोन दिवसांत रचला कट

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती

सुपारीच्या पैशातून घेतली शस्त्रे

पुणे/26 नोव्हेंबर : पुणे न्यायालयाच्या परिसरातच मंदार किवळे याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. 2025 मध्ये झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे आता निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असून, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तपासात कोणती माहिती आतापर्यंत मिळाली, याबद्दल सांगितले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, मंदार किवळे हा तीन दिवसांपूर्वीच जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आला होता. न्यायालयाच्या कामासाठी तो शिवाजीनगरला आला आणि त्यावेळी ही घटना घडली. आरोपींची चौकशी करण्यात आली असून, दोन दिवसांतच हत्या करण्याचा कट बनवला होता, असे त्यांनी सांगितले. मंदार किवळे याला जामीन मिळाला असून, तो बाहेर आल्याचे आरोपींना माहिती होते. पण, त्याचे ठिकाण त्यांना माहिती नव्हते, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. मंदार किवळेची न्यायालयात तारीख असल्याची आणि तो न्यायालयात जाणार माहिती आरोपींना मिळाली. त्यानंतर दोन दिवसांतच त्यांनी कट रचला आणि हा हल्ला केला, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. अमितेश कुमार यांनी सांगितले की, मंदार किवळेवर हल्ल्याची सुपारी देण्यात आली होती. यासाठी काही पैसे ठरले होते. त्यापैकी काही पैसे दिले गेले होते. त्याच पैशातून आरोपींनी काही शस्त्रे विकत घेतली होती. आरोपींची आणखी चौकशी केली जाणार असून, त्यातून काही गोष्टी स्पष्ट होतील, असेही ते म्हणाले.

आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी

पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर मंदार किवळे याच्यावर झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ला प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी (26 नोव्हेंबर) अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. डी. पंजवानी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली. पोलिसांनी आरोपींच्या दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. हल्ल्यासाठी वापरलेली शस्त्रे कुठून आणली, हल्ल्याचे नियोजन कसे केले आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.

Back to top button