स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षापर्यंत विकसित भारताचे ध्येय

संविधान दिनानिमित्त आंबेडकर महाविद्यालयात विविध उपक्रम

प्रमुख व्याख्यात्या प्राजक्ता शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन

अमरावती/26 नोव्हेंबर : दादासाहेब गवई विश्वस्त संस्था संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ’विकसित भारत 2047’ हे ध्येय गाठण्यासाठी गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडून भारतीय संस्कृतीचा सार्थ अभिमान बाळगावा असे ठाम प्रतिपादन प्रमुख व्याख्यात्या प्राजक्ता शिंदे यांनी केले. सकाळी 10 वाजता रामकृष्ण शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिसरातून भव्य संविधान फेरी काढली. या फेरीतून स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या संविधानातील मूल्यांचा जागर करण्यात आला. त्यानंतर महाविद्यालयाच्या कोलंबिया सभागृहात मुख्य सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा प्राचार्य डॉ. कमलाकर पायस होते तर प्रमुख अतिथी म्हणून अजिंक्य गवई आणि प्रा. पी. आर. एस. राव उपस्थित होते. विचारमंचावर डॉ. कृष्णा माकोडे आणि डॉ. शुद्धोधन कांबळे उपस्थित होते. प्रास्ताविकातून डॉ. शुद्धोधन कांबळे यांनी मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या संविधान महोत्सवाची परंपरा आणि ’माझे युवा भारत केंद्र अमरावती’ यांच्या संयुक्त सहकार्याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ. कमलाकर पायस यांनी ’आम्ही भारताचे लोक’ या भावनेतून हे संविधान आपण स्वतःलाच अर्पण केले असून ते राबवणारे हात चांगले असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपाली पडोळे यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत खेडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पी. आर. एस. राव डॉ. श्याम तंत्रपाळे डॉ. सुनील कुमार डॉ. शुद्धोधन कांबळे प्रा. दीपाली गवई विजय इंगळे आदि उपस्थित होते.

Back to top button