अतिक्रमणांवर नगर परिषदेचा जेसीबीचा प्रहार

अचलपूर 26 नोव्हेंबर : शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी अखेर अचलपूर नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग दिला आहे. बुधवारी कडक पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जेसीबीच्या साहाय्याने 40 हून अधिक अतिक्रमित बांधकामे हटविण्यात आली. हिरापुरा, विलायतपुरा, देवडी आणि सैतुतबाग परिसरात झालेल्या या कारवाईमुळे रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करून रस्ते अधिक प्रशस्त करण्याच्या उद्देशाने नगर परिषदेकडून रस्ता रुंदीकरणाची कामे प्रस्तावित आहेत. मात्र, मुख्य रस्त्यांच्या कडेला झालेल्या अतिक्रमणांमुळे या कामांमध्ये अडथळे निर्माण होत होते. हिरापुरा गेट ते काळा मारुती, आयटीआय, ईदगाह चौक ते विलायतपुरा तसेच विलायतपुरा ते हिरापुरा गेट या मार्गांवरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी सुमारे 11 वाजता नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोलीस बंदोबस्तासह कारवाईसाठी घटनास्थळी दाखल झाले. सराफा लाइन, देवडी चौक आणि देवडी परिसरासह विविध ठिकाणी रस्ता रुंदीकरणाला बाधा ठरणारे ओटे, थापे, जिने, वॉल कंपाऊंड तसेच इतर अतिक्रमित बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. संबंधित अतिक्रमणधारकांना नगर परिषदेकडून यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या
दिवसभर सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. काही ठिकाणी नागरिकांकडून नाराजी व आक्रोशही व्यक्त करण्यात आला. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कडक पोलीस बंदोबस्तात नगर परिषद प्रशासनाने मोहीम सुरू ठेवत 40 हून अधिक अतिक्रमणे हटविली.
मुख्याधिकारी धीरजकुमार गोहाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता मनीष शर्मा, नगर रचना अधिकारी ऋषभ सवई, विशाल तांदळे तसेच बांधकाम विभागाचे सलीम अहमद, अनिस अहमद, शेख रशीद यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.रस्ते रुंदीकरणामुळे शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून, नागरिकांना सुरक्षित व प्रशस्त रस्ते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अतिक्रमण हटाव मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, कारवाईनंतर संबंधित रस्त्यांचे रुंदीकरण आणि प्रत्यक्ष विकासकामेही तातडीने पूर्ण करण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर राहणार आहे.





