दस्तुर नगरात 38 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू

धारदार शस्त्राने नव्हे तर गंभीर आजारामुळे घात झाल्याचा संशय

राजापेठ पोलीस व गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेऊन केली पाहणी

अमरावती /8 ऑक्टोबर- दस्तुर नगर चौकाजवळ गुरुवारी सकाळी भानखेडा येथील 38 वर्षीय सुनील भगवान शिंदे या तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. सुरुवातीला धारदार शस्त्राने हत्या झाल्याचा संशय आल्याने लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले होते. मात्र राजापेठ पोलीस आणि गुन्हे शाखेने तातडीने धाव घेऊन पाहणी केली असता सुनील शिंदे यांचा घात जुन्या गंभीर आजारामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.
भानखेडा येथील रहिवासी असलेले सुनील भगवान शिंदे हे मिक्सर दुरुस्तीचे काम करून कुटुंबाचा गाडा चालवत होते. नेहमीसारखे ते बुधवारी सकाळी 9 वाजता घरातून कामाच्या शोधात अमरावती शहरात आले होते. मात्र रात्र उलटून गेली तरी ते घरी परतलेच नाहीत. घरच्यांनी रात्रभर सर्व नातलग आणि परिचितांकडे त्यांची शोधाशोध केली पण त्यांचा काहीच सुगावा लागला नाही.
गुरुवारी सकाळी दस्तुर नगर चौकातील मोकळ्या जागेत एका तरुणाचा रक्ताळलेला मृतदेह पडल्याचे नागरिकांना दिसले. अंगावरील कपडे रक्ताने पूर्ण भरलेले असल्याने अज्ञात हल्लेखोरांनी खून केल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली आणि घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. घटनेची वर्दी मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे पथक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठीशासकीय रुग्णालयात रवाना केला.परिसरातील छायाचित्रण यंत्रणेची तपासणी केली असता महत्त्वाची माहिती समोर आली. बुधवारी दुपारपर्यंत सुनील हे दस्तुर नगर चौकात मित्रांसोबत गप्पा मारत उभे होते. मित्र निघून गेल्यावर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना आधीपासून यकृताचा त्रास आणि पोट फुगण्याचा गंभीर आजार होता. प्रकृती खालावल्याने ते एकाच जागेवर 3 तास तडफडत पडून होते. शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्त वाहून कपडे रक्ताने माखले आणि वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा करुण अंत झाला. मृत्यूचे मूळ कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
सीसीटीव्ही आणि नातेवाइकांकडून आजाराचा उलगडा- सुनील शिंदे यांच्या अंगावर रक्त पाहून परिसरात खुनाची अफवा पसरली होती. नातेवाइकांनी चौकशीत सुनील यांना यकृताचा जुनाट आजार असल्याचे पोलिसांना सांगितले. छायाचित्रण यंत्रणेत सुनील हे आजारी अवस्थेत 3 तास रस्त्यावर पडून असल्याचे दिसले. अंतर्गत रक्तस्रावामुळेच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज असून उत्तरीय तपासणी अहवालानंतर खरी वस्तुस्थिती समोर येणार आहे.

Back to top button