शरद पवारांचा पक्षच भाजपची बी टीम?
अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांचा निशाणा

मुंबई/24 नोव्हेंबर – देशात सध्या डिलिमीटेशन बिलाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या बिलाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीतही दुमत असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित ‘डिलिमिटेशन बिला’ला सशर्त पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. डिलिमिटेशन विधेयकाची अधिकृत प्रत हाती आल्यानंतरच पक्ष अंतिम निर्णय घेईल, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या याच वक्तव्यावरून निवृत्त प्राध्यापिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी शरद पवार गटावर टीका केली आहे.
भाजपच्या ‘डीलिमिटेशन बिल’ला पाठिंबा देण्याच्या अलीकडील निर्णयावरून किती स्त्रीवाद्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना उघड पत्र लिहून टीका केली? ‘निर्भय बनो’ चळवळीतील किती कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भाजपची ‘बी-टीम’ म्हटले? असे प्रश्न उपस्थित करत अंजली दमानिया यांनी भली मोठी पोस्ट लिहत शरद पवार गटावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि ‘निर्भय बनो’चे कार्यकर्ते ‘व्हीबीए’ स्वतंत्रपणे निवडणूक लढवतात, म्हणून लगेच त्यांना भाजपची ‘बी-टीम’ ठरवतात. परंतु, जेव्हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे उघडपणे भाजपला राजकीय मदत करतात, तेव्हा मात्र हे लोक गप्प बसतात. जे उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि ‘निर्भय बनो’चे कार्यकर्ते इतर वेळी खूप आक्रमकपणे बोलतात, तेच लोक आता प्रबळ जातींच्या पक्षांना प्रश्न विचारण्यास असमर्थ ठरतात, ज्या पक्षांसाठी त्यांनी 2024 च्या निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. हे केवळ वैचारिक विसंगतीचे प्रकरण नाही, तर ही राजकीय सोयी आणि जातीवर आधारित ‘निवडक संताप’ दर्शवणारी कृती आहे, अशी टीका त्यांनी केली. अंजली आंबेडकर म्हणाल्या की, शरद पवार गटाच्या राजकीय नैतिकतेमध्ये एक विचित्र दुटप्पीपणा दिसून येतो. ते बहुजन समाजाच्या राजकीय आग्रहावर आणि ‘व्हीबीए’च्या स्वतंत्र अस्तित्वावर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, परंतु सवर्ण राजकीय पक्षांच्या अशा कृतींकडे दुर्लक्ष करतात, ज्या प्रत्यक्षात भाजपच्या सामाजिक-राजकीय अजेंड्याला बळकट करत आहेत. खरंतर भाजपचे प्रस्तावित ‘डीलिमिटेशन बिल’ हे ‘एसआयआर’ पेक्षाही अधिक धोकादायक आहे. हे विधेयक उत्तर भारतातील राज्यांचे संसदीय प्रतिनिधित्व असप्रमाणपणे वाढवेल. यामुळे भारताचा संघीय समतोल पूर्णपणे बिघडू शकतो. राजकीय सत्ता एका विशिष्ट प्रादेशिक गटाच्या हातात एकवटू शकते आणि समान संघीय प्रतिनिधित्वाच्या लोकशाही तत्त्वाला धक्का बसू शकतो. कारण ही केवळ एक तांत्रिक संसदीय प्रक्रिया नाही, तर हा प्रश्न थेट भारतीय लोकशाहीच्या भविष्याशी संबंधित आहे, असे त्यांनी म्हटले.
अंजली आंबेडकर म्हणाल्या की, शरद पवार आणि सुप्रिया सुळे अशा राजकीय प्रक्रियेला बळ देत आहेत, जी भाजपच्या विभाजनकारी अजेंड्याला पुढे नेते आणि भारताच्या लोकशाही व संघीय पायाला कमकुवत करते, हे कोणापासूनही लपलेले नाही. मग प्रश्न असा पडतो की, उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि ‘निर्भय बनो’चे कार्यकर्ते यावर गप्प का आहेत? ‘व्हीबीए’ने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली की, ती लगेच भाजपची ‘बी-टीम’ ठरते, पण शरद पवार आणि सुप्रिया सुळे जे भाजपच्या राजकीय अजेंड्याला मदत करतात आणि त्याला कायदेशीर वैधता मिळवून देतात, त्यांना मात्र ‘बी-टीम’ का म्हटले जात नाही? तुमची ही शांतताच हे सिद्ध करते की, तुमचा संताप हा केवळ राजकीय सोयी आणि जातीवर आधारित आहे. हे उघड करते की, तुम्ही बौद्धिकदृष्ट्या अप्रामाणिक आहात आणि बहुजन पक्षांविरुद्ध तुमच्या मनात द्वेष आहे. तुम्ही सर्वजण विकले गेलेले लोक आहात, असा खळबळजनक दावा देखील अंजली दमानिया यांनी केला.





