महापरिनिर्वाण दिनासाठी विशेष रेल्वेगाड्या

नागपूर, अमरावतीहून मुंबईसाठी जादा गाड्या; विदर्भातील प्रवाशांना दिलासा

अमरावती/24 नोव्हेंबर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाणार्‍या अनुयायांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने नागपूर, अमरावती आणि मुंबईदरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-मुंबई, मुंबई-नागपूर तसेच अमरावती-मुंबई मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार असल्याने विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या गाड्यांना विविध प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
नागपूरहून मुंबईसाठी 4 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. रेल्वे क्रमांक 01260 ही गाडी 4 डिसेंबरला सकाळी 6.10 वाजता नागपूरहून सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी 10.55 वाजता मुंबईत पोहोचेल. रेल्वे क्रमांक 01262 ही 4 डिसेंबरला रात्री 11.55 वाजता रवाना होऊन दुसर्‍या दिवशी दुपारी 4.15 वाजता मुंबईत पोहोचेल. याशिवाय 5 डिसेंबरला सकाळी 7.40 आणि संध्याकाळी 6.10 वाजता आणखी 2 गाड्या धावतील. मुंबईहून नागपूरसाठी 5 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या 6, 7 आणि 8 डिसेंबरला वेगवेगळ्या वेळेत रवाना होतील. अमरावती-मुंबई मार्गावरही 5 डिसेंबरला विशेष गाडी सोडण्यात येणार असून, परतीसाठी 7 डिसेंबरला गाडी उपलब्ध राहणार आहे. या गाड्यांना वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, भुसावळ, जळगाव, कल्याण आणि दादर यांसह विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाणार्‍या अनुयायांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. नागपूर, अमरावती आणि मुंबईदरम्यान अतिरिक्त रेल्वेसेवा सुरू केल्याने प्रवासाची सोय होणार आहे. विदर्भातील प्रमुख स्थानकांवर थांबे असल्याने अनेक भागांतील प्रवाशांना मुंबई गाठणे सोपे होणार आहे. या विशेष रेल्वेगाड्यांमुळे गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होईल.

Back to top button