धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत, प्रवाशांचे हाल

मुंबई-अमरावती मार्गावरील विमान उड्डाणे रद्द

कमी दृश्यमानतेमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव निर्णय

अमरावती /24 नोव्हेंबर – अमरावती आणि मुंबईदरम्यान सुरू असलेल्या विमानसेवेवर खराब हवामानाचा मोठा परिणाम झाला असून, कमी दृश्यमानतेमुळे काही उड्डाणे रद्द करण्यात आली. विमानतळ परिसरात धुक्याचे प्रमाण वाढल्याने विमान उतरवणे आणि उड्डाण करणे धोकादायक ठरत असल्याचे सांगण्यात आले. परिणामी, मुंबईहून अमरावतीला येणार्‍या आणि अमरावतीहून मुंबईला जाणार्‍या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक प्रवाशांना विमानतळावर पोहोचल्यानंतर उड्डाण रद्द झाल्याची माहिती मिळाली, तर काहींना पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागली.
विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, अमरावतीहून सकाळी 7.30 वाजता सुटणारे विमान 8.50 वाजता मुंबईत पोहोचते. मुंबईहून परतीचे विमान सकाळी 9.15 वाजता सुटून 10.30 वाजता अमरावतीला पोहोचते. मात्र, बेलोरा विमानतळ परिसरात दृश्यमानता 800 ते 1,000 मीटरपर्यंत घसरली होती. विमान उड्डाण आणि उतरवण्यासाठी साधारण 3,000 मीटर दृश्यमानता आवश्यक असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणे रद्द करण्यात आली. सध्या मुंबई-अमरावती विमानसेवा आठवड्यातील 4 दिवस, रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सुरू असते. यापूर्वीही खराब हवामानामुळे विमानसेवा विस्कळीत झाली होती. सततच्या उड्डाण रद्दमुळे प्रवाशांमध्ये नाराजी असून, विमानसेवा सुरळीत ठेवण्यासाठी हवामानाचा अचूक अंदाज आणि पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

Back to top button