डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्यासाठी काँग्रेसची ‘अभिवादन यात्रा’

पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात करणार मार्गदर्शन

के. राजू, मुकुल वासनिक, विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती

श्रद्धाभूमी नया अकोला येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य आयोजन

अमरावती/24 नोव्हेंबर  – भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवार दि. 6 डिसेंबर 2026 रोजी भव्य अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग पाचव्या वर्षी होणार्‍या या यात्रेचा प्रारंभ सकाळी 9 वाजता इरविन चौकातून होऊन नया अकोला येथील पवित्र श्रद्धाभूमी अस्थी स्मारक येथे सामूहिक अभिवादना नंतर सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात अभिवादन सभा पार पडेल. या सभेला प्रख्यात अर्थतज्ज्ञ पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांच्यासह राष्ट्रीय व राज्य पातळीवरील दिग्गज नेते मार्गदर्शन करणार असून संविधान रक्षणासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. भारत जोडो यात्रेतून प्रेरणा घेत महामानवाच्या विचारांचा जागर करण्यासाठी काँग्रेसने हे पाऊल उचलले आहे. अमरावती शहरातील इरविन चौकातून निघणारी ही यात्रा पंचवटी, शेगाव नाका, कठोरा नाका, नवसारी, वलगाव या गावखेड्याच्या मार्गावरून थेट नया अकोला येथील श्रद्धाभूमीवर पोहोचेल. अस्थी स्मारकावर नतमस्तक झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर मुख्य सभा होईल. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे झारखंड प्रभारी के. राजू, राज्यसभा खा. मुकुल वासनिक, राष्ट्रीय सचिव श्रीवेल्ला प्रसाद, आ. डॉ. विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सोबतच माजी मंत्री व आ. ड. यशोमती ठाकूर, खा. बळवंत वानखेडे, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी आ. प्रा. विरेंद्र जगताप हे देखील व्यासपीठावर उपस्थित राहून कार्यकर्त्यांना व नागरिकांना संबोधित करतील. लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी आणि आपल्या महामानवाला आदरांजली वाहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्तरांतील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Back to top button