एसटी बँकेतील 25 कोटींच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीला वेग

संबंधित अधिकार्‍यांची 2 डिसेंबरला बैठक

मुंबई/25 नोव्हेंबर  : स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेतील सुमारे 25 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारासह अन्य अनियमिततेच्या आरोपांची परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली. या प्रकरणात स्वतः लक्ष घालून दोषींवर कारवाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, प्रकरणाच्या चौकशीचा आढावा घेण्यासाठी 2 डिसेंबर रोजी संबंधितांची बैठक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी बुधवारी सरनाईक यांची भेट घेऊन बँकेतील कथित गैरव्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. कर्मचार्‍यांच्या कष्टाच्या पैशातून उभ्या राहिलेल्या बँकेतील आर्थिक अनियमिततेची चौकशी जलदगतीने पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली. बँकेतील फर्निचर, नूतनीकरण, संगणक, वातानुकूलन यंत्रणा, सीसीटीव्ही आणि अन्य साहित्य खरेदीत सुमारे 25 कोटी रुपयांचा क थित गैरव्यवहार झाल्याचा आरा े प करण्यात अ ा ल ा आ ह े . ठरावीक कंत्राटदारांशी संगनमत करून निविदा प्रक्रियेत बनावट स्पर्धा निर्माण करण्यात आली का, याची सहकार विभागामार्फत चौकशी सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. साहित्याचा पुरवठा होण्यापूर्वीच कंत्राटदारांना 100 टक्के आगाऊ रक्कम दिली असून महत्त्वाचा दस्तऐवज गहाळ झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात कागदपत्रे नष्ट करून गैरव्यवहार लपविण्याचा प्रयत्न झाला का, याची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू असून, ती तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दोषींवर कारवाई करण्याची मागणी

या सर्व प्रकरणांची स्वतंत्र आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी, फॉरेन्सिक लेखापरीक्षण, गुन्हा दाखल करून दोषींवर कारवाई आणि बँकेचे आर्थिक नुकसान संबंधितांकडून वसूल करण्याची मागणी बरगे यांनी केली. या प्रकरणात स्वतः लक्ष घालून संबंधितांना कारवाईचे निर्देश देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरनाईक यांनी आश्वासन दिले.

Back to top button