100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे

मुख्यमंत्री फडणवीसांकडून सत्कार, संमेलनासाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई/25 नोव्हेंबर  -पुण्यात होणार्‍या 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीची घोषणा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आली. या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत डॉ. लिंबाळे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावरील पुस्तक आणि शाल देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी संमेलनाचे निमंत्रक राजेश पांडे, प्रा. विजयकुमार खंदारे आणि प्रदीप गायकवाड उपस्थित होते. पुण्यात होणारे हे संमेलन मराठी साहित्यविश्वासाठी विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा 100 वा टप्पा गाठत असताना अध्यक्षपदाची धुरा डॉ. लिंबाळे यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अभ्यासू साहित्यिकाकडे सोपवण्यात आली आहे.
अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा-100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्यासह रमेश पतंगे, विजय कुवळेकर आणि बाबा भांड यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, अखेर डॉ. लिंबाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परिषदेत सुरू असलेले अंतर्गत मतभेदही चर्चेत आले होते.
शासकीय निधीच्या हिशेबावरून तसेच आर्थिक अनियमिततेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र साहित्य परिषदेत वाद निर्माण झाला होता. मसापचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्याविरोधात कार्यकारिणीतील 21 सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. या तिघांकडे साहित्य महामंडळातीलही महत्त्वाची पदे असल्याने या वादाला अधिक महत्त्व प्राप्त झाले.अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर संबंधित पदाधिकार्‍यांना संमेलनाच्या अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत निर्णय घेण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार नसल्याचा दावा 21 सदस्यांच्या गटाने केला होता. त्यामुळे या गटाने महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम सप्रे यांच्याशी थेट संपर्क साधला. अध्यक्षपदासाठी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्यासह अन्य काही नावांचा विचार करावा, अशी मागणी या सदस्यांनी पत्राद्वारे केली होती. या सर्व घडामोडींनंतर अखेर लिंबाळे यांची निवड जाहीर झाली.

Back to top button