कोणार्कच्या स्वच्छता कराराची कसून चौकशी होणार

राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य रवी रामू कलोसे यांनी दिली माहिती

मनपातील निम्म्या रिक्त पदांवर तातडीने भरतीचे आदेश

खाजगी स्वच्छता कर्मचार्‍यांनाही मिळणार शासकीय लाभ

अमरावती /25 नोव्हेंबर- अमरावती महापालिकेच्या सफाई कामाचा मक्ता घेतलेल्या कोणार्क कंपनीच्या कराराची सखोल तपासणी करण्याची मोठी घोषणा राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य रवी रामू कलोसे यांनी केली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महापालिकेतील निम्म्या रिक्त जागांवर भरती करण्यासोबतच शहर आणि ग्रामीण भागातील खाजगी गटारे साफ करणार्‍या कामगारांनाही शासकीय योजनांचा लाभ देण्याचे सक्त आदेश दिले. महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी चांगलेच ताशेरे ओढले असून येत्या महिनाभरात या सर्व प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर केला जाईल.
महापालिकेच्या डॉ. आंबेडकर सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत राज्यमंत्री दर्जा असलेले रवी रामू कलोसे यांनी पत्रकारांना ही सविस्तर माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने सफाई कामगार आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमरावती महापालिका आणि कोणार्क कंपनी यांच्यात झालेल्या स्वच्छता कराराची संपूर्ण कागदपत्रे आज आयोगाने ताब्यात घेतली आहेत. या कराराचा बारकाईने अभ्यास करून पुढील महिनाभरात महापालिका प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले जातील असे कलोसे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. हाताने मैला उचलण्यास प्रतिबंध करणार्‍या कायद्याच्या कलम 3 आणि 5 नुसार कोणार्क कंपनी या कामासाठी खरोखर पात्र आहे का याची तपासणी केली जाईल असे कलोसे यांनी सांगितले. शासकीय नियमांनुसार ठेकेदाराची पात्रता तपासण्याचे पूर्ण अधिकार आयोगाला आहेत. करारात कामगारांच्या सुरक्षेची साधने आणि इतर अत्यावश्यक सुविधांचा स्पष्ट उल्लेख असणे बंधनकारक आहे. अमरावती महापालिकेच्या करारात या सर्व नियमांचेकाटेकोर पालन झाले आहे की नाही याचा सखोल तपास करून आयोग आपला निष्कर्ष महापालिकेला कळवणार आहे.अमरावती महापालिकेत सफाई कामगारांच्या एकूण 861 मंजूर जागा असून त्यापैकी 714 जागा भरल्या आहेत. उर्वरित रिक्त जागांपैकी 50 टक्के पदे तात्काळ भरण्याचे आदेश आज दिल्याचे कलोसे यांनी पत्रकारांना सांगितले. ही संपूर्ण भरती प्रक्रिया केवळ मेहतर वाल्मिकी समाजातील उमेदवारांमधूनच केली जावी अशी स्पष्ट ताकीद त्यांनी दिली आहे. यासोबतच सफाई कामगारांचे रखडलेले प्रमोशन आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना लिपिक वर्गात सामावून घेण्याबाबतही प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत. शहरातील प्रत्येक वस्तीत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यात महापालिका पूर्णपणे अपयशी ठरल्याबद्दल कलोसे यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून खाजगीरीत्या मैला टाकी आणि गटारे साफ करणार्‍या कामगारांचीही सफाई कामगार म्हणून नोंदणी करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. या सर्व कामगारांना महात्मा फुले महामंडळाच्या सर्व योजना आणि नमस्ते योजनेचा थेट लाभ मिळालाच पाहिजे असे त्यांनी सांगितले. अद्याप अनेक कामगारांना या योजनांची साधी माहितीही नसल्याची खंत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.सफाई कामगारांचा विमा आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम महापालिकेने वेळेत जमा करावी असे कडक आदेश कलोसे यांनी दिले आहेत. कामगारांचे मूलभूत अधिकार अबाधित राहावेत आणि त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी राष्ट्रीय सफाई कामगार आयोग आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाशी समन्वय साधून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या बैठकीत घेतलेल्या सर्व निर्णयांचा आढावा जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत घेतला जाईल आणि त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील दौर्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन महापालिकेच्या आजच्या निर्णयांची अंमलबजावणी तपासली जाईल असे कलोसे यांनी सांगितले. या बैठकीत जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि सर्व नगर पालिका तसेच नगर पंचायतींच्या सफाई कामगारांच्या प्रश्नांचाही आढावा घेतला जाईल. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय स्तरावर आढावा बैठक घेण्यात येईल. 31 मार्च 2028 पर्यंत आपला कार्यकाळ असून तोपर्यंत आपण या सर्व प्रश्नांचा सतत पाठपुरावा करत राहू असेही रवी रामू कलोसे यांनी पत्रकारांना सांगितले.

Back to top button