भोंदूबाबा अरुण पाटील अटकेत
आजार बरा करण्याच्या बहाण्याने महिलेस लुबाडले

नाशिक/24 नोव्हेंबर – घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासह घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलेची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करणार्या भोंदूबाबाला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. अस्थम्याचा आजार बरा करण्याचे आश्वासन देत जादूटोण्याच्या नावाखाली अघोरी पूजा करून त्याने महिलेची आर्थिक फसवणूक केली होती. अरुण धोंडू पाटील (वय 48, रा. ध्रुवनगर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2022 ते 19 ऑक्टोबर 2026 या कालावधीत संशयित अरुण पाटील याने फिर्यादी महिलेला अस्थम्याचा आजार बरा करण्याचे तसेच घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी जादूटोण्याच्या नावाखाली अघोरी पूजा आणि विविध विधी केल्याचा बनाव केला. या माध्यमातून त्याने महिलेकडून तब्बल सात लाख 50 हजार रुपये उकळले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 448/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 316 (2), 318 (4) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 च्या कलम 3 आणि 3 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार होता.दरम्यान, संशयित अरुण पाटील हा म्हसरूळ वस्ती परिसरात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा, आंबड युनिट-3 च्या पोलीस पथकाला मिळाली. पोलीस अंमलदार गौरव धात्रक, महेंद्र दोंदे आणि राजेश महाले यांनी ही माहिती दिल्यानंतर प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या पथकाने सापळा रचला. 23 नोव्हेंबर रोजी संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.





