तीन तेल कंपन्या आगीच्या विळख्यात
कोट्यवधींच्या नुकसानीची भीती

नवी मुंबई/23 नोव्हेंबर : नवी मुंबईतील वाशी येथील सेक्टर 18 मधील माफको मार्केट परिसरात रविवारी मध्यरात्री एका तेल कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण करत शेजारील प्लायवूड युनिट आणि एका कुरिअर कंपनीलाही आपल्या विळख्यात घेतले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. पहाटे दोन वाजेपर्यंत आगीच्या उंचच उंच ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले होते. रविवारची सुटी असल्याने संबंधित कंपन्यांमध्ये कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाह.प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास तेल कंपनीच्या गोदामात अचानक आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणावर तेल आणि अन्य ज्वलनशील पदार्थांचा साठा असल्याने आगीने वेगाने पेट घेतला. काही वेळातच तिची तीव्रता वाढली आणि आगीचे लोण आसपासच्या औद्योगिक आस्थापनांपर्यंत पोहोचले. या आगीत शेजारील प्लायवूड युनिट आणि कुरिअर कंपनीलाही मोठा फटका बसला. प्लायवूड, लाकूड तसेच पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्या साहित्यामुळे आग अधिक भडकली आणि ती आटोक्यात आणण्याचे काम अग्निशमन दलासाठी आव्हानात्मक ठरले.





