बेपत्ता बाळांच्या शोधात पोलीस पथके उत्तर प्रदेश व मुंबईला रवाना
डॉ. भोजने नवजात बालक विक्री रॅकेटच्या तपासाचा घेरा वाढला

बारा वर्षांपूर्वीच्या प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
गाडगेनगर रुग्णालयातील जुने दस्तऐवज रहस्यमयरित्या गायब
मनपाच्या जन्म-मृत्यू विभागातून दस्तऐवज घेतले ताब्यात
अमरावती/23 नोव्हेंबर – शहरात गाजत असलेल्या नवजात बालविक्री आणि मानवी तस्करी प्रकरणात पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. डॉ. वैशाली भोजने आणि प्रफुल्ल भोजने यांच्या चौकशीतून 2014 ते 2016 या काळात त्यांच्या रुग्णालयात 132 बाळांचा जन्म झाल्याचे उघड झाले आहे. महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातून पोलिसांनी हे दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. आतापर्यंत चार नवजात बाळांची सुखरूप सुटका करण्यात आली असून बेपत्ता असलेल्या दोन बाळांच्या शोधासाठी पोलीस पथके उत्तर प्रदेश आणि मुंबईला रवाना होणार आहेत. तसेच 12 वर्षांपूर्वी एका सोनाराला दिलेल्या मुलीचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
शहरातील बुटी प्लॉट परिसरात डॉ. वैशाली भोजने यांनी 2014 मध्ये भोजने प्रसूती आणि शुश्रूषा गृह सुरू केले होते. 2014, 2015 आणि 2016 या तीन वर्षांत येथे 132 बाळांचा जन्म झाल्याची नोंद महापालिकेकडे आढळली आहे. 22 नोव्हेंबर रोजी फ्रेझरपुरा पोलिसांनी महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातून या तीन वर्षांचे सर्व दस्तऐवज जप्त केले. 2018 पासून जन्म-मृत्यूच्या नोंदी संगणकीय पद्धतीने सुरू झाल्या होत्या. त्याआधीच्या काळातील म्हणजेच 2014 ते 2018 दरम्यान झालेल्या सर्व प्रसूतींची माहिती पोलीस आता जुन्या फायलींमधून शोधत आहेत.
अटक करण्यात आलेले डॉ. वैशाली भोजने, प्रफुल्ल भोजने यांची पोलिसांनी दहा दिवस कसून चौकशी केली. 2014 ते 2026 या काळात मध्यस्थांच्या मदतीने सहा नवजात बाळांची बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि अदलाबदल झाल्याचे उघड झाले आहे. यापैकी चार बाळांना पोलिसांनी सुरक्षित ताब्यात घेतले असून उर्वरित दोन बाळांचा शोध सुरू आहे. सुटका केलेल्या बाळांमध्ये मूळ प्रकरणातील साडेसतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या बाळाचाही समावेश आहे. याशिवाय अमरावती, वर्धा, अकोला जिल्ह्यांतील जोडप्यांकडून ही बाळे ताब्यात घेण्यात आली आहेत.
बेपत्ता असलेल्या दोन बाळांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. या बाळांबाबत डॉ. वैशाली भोजने यांच्याकडून ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे इतर संशयित आणि मध्यस्थांकडून माहिती काढून पोलीस पथके उत्तर प्रदेश आणि मुंबईतील संभाव्य ठिकाणी रवाना होत आहेत. दुसरीकडे या तपासाची व्याप्ती शहरातील इतर रुग्णालयांपर्यंत पोहोचली आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रुग्णालयातील गेल्या 15 वर्षांचे जुने नोंदणी पुस्तकच गायब असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना तेथे केवळ दोन वर्षांचे कागदपत्र सापडले आहेत. या प्रकरणात डॉ. जयस्वाल यांचे नाव समोर आले असून अद्याप त्यांना अटक झालेली नाही.या तपासात 2014 मधील एक जुने प्रकरणही समोर आले आहे. बेलपुरा भागातील एका महिलेने 2014 मध्ये मुलीला जन्म दिला होता. पतीला पाठीच्या कण्याचा गंभीर आजार असल्याने घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. याचाच फायदा घेत डॉ. वैशाली भोजने यांनी एका सोनाराला मुलीची गरज असल्याचे सांगितले. त्या महिलेला 50 हजार रुपये देऊन कागदपत्रांवर सह्या घेतल्या आणि मुलगी सोनाराच्या स्वाधीन केली. याप्रकरणी फ्रेझरपुरा पोलिसांनी एका महिला डॉक्टरांची तासन् तास चौकशी करून जबाब नोंदवला आहे. ती मुलगी आता 12 वर्षांची झाली असून पोलीस गुप्तपणे तिचा शोध घेत आहेत.
या रॅकेटमध्ये महिला मध्यस्थ मेरी उर्फ प्रतिभा नगराले आणि रुग्णालयातील कर्मचारी संगीता गवळी यांची भूमिका संशयास्पद आहे. 22 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मेरी उर्फ प्रतिभा हिची चार तास चौकशी केली. या व्यवहारांत या दोघींचा मोठा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच डॉ. भोजने यांनी तीन बाळांचा जन्म आपल्याच रुग्णालयात झाल्याचे दाखवून महापालिकेकडून जन्म दाखले मिळवले होते. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पोलिसांनी याबाबत माहिती मागवली असून भोजने यांच्या सोनोग्राफी केंद्राचे गेल्या 14 वर्षांचे दस्तऐवजही तपासले जात आहेत. सहा महिन्यांपूर्वी अकोला येथील एका जोडप्याला बाळ देताना अपूर्ण कागदपत्रे देण्यात आली होती. पुढील कागदपत्रे नंतर देण्याचे आश्वासन त्यांना दिले गेले होते. दहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी डॉ. वैशाली भोजने, प्रफुल्ल भोजने यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दलाल निर्मल सरदार, मेरी उर्फ प्रतिभा, संगीता गवळी यांची चौकशी अद्याप सुरूच आहे.
चार बाळांचा होलीक्रॉस शिशुगृहात सांभाळ -पोलिसांनी सुखरूप सुटका केलेल्या चारही नवजात बाळांना बाल न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक होलीक्रॉस शिशुगृहात ठेवण्यात आले आहे. तेथे या बाळांची योग्य काळजी घेतली जात आहे. या बाळांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेद्वारे योग्य जोडप्यांना त्यांना दत्तक दिले जाऊ शकते. दत्तक घेणार्या कुटुंबाला आपल्या एकूण मालमत्तेचा 60 टक्के हिस्सा संबंधित बाळाच्या नावावर करावा लागेल, अशी अट सांगण्यात आली असून याबाबत कायदेशीर पडताळणी सुरू आहे.
पोलिसांसमोरील तपासाचे अनेक मोठे प्रश्न- 2014 ते 2016 दरम्यान जन्मलेल्या 132 बाळांच्या नोंदींची तपासणी कधी पूर्ण होणार. बेपत्ता दोन बाळे नेमकी कोणाकडे आहेत. 12 वर्षांपूर्वी सोनाराला दिलेली मुलगी सध्या कोणत्या कुटुंबात आहे. गाडगेनगरच्या रुग्णालयातील 15 वर्षांचे नोंदणी पुस्तक कोणी गायब केले. बनावट जन्म दाखले तयार करताना कोणाची मदत घेतली गेली. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाचे जाळे विस्तारले असून मुंबई आणि उत्तर प्रदेशच्या मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





