कौंडण्यपूर विकास आराखडा प्रत्यक्षात आणणार
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही

वर्धा नदीला 221 मीटरची अर्पण केली साडी
जलसंवर्धनात सहभाग देण्याचे नागरिकांना आवाहन
अंबा-रुख्मिणी महोत्सवात भक्तांची मांदियाळी
अमरावती/23 नोव्हेंबर – माता रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपूरचा ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व कामे मार्गी लावण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. येथील अंबा-रुक्मिणी महोत्सवात वर्धा नदीला 221 मीटर लांबीची महावस्त्र साडी अर्पण करून त्यांनी राज्याच्या दुष्काळमुक्तीसाठी साकडे घातले आणि नागरिकांना जलसंवर्धनाचे आवाहन केले.
कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानात आयोजित अंबा-रुक्मिणी महोत्सवात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी आ. प्रवीण तायडे, माजी खा. नवनीत राणा, मंदिराचे अध्यक्ष नामदेवराव अंबाडकर आणि संत-महंत उपस्थित होते. कौंडण्यपूर हे अमरावती आणि विदर्भाच्या संस्कृतीचे लेणे असून विकास आराखड्यातील कामांना आता गती दिली जाईल. यासाठी येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विशेष बैठक घेऊन सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी, बावनकुळे यांनी विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. त्यानंतर वर्धा नदीचे पूजन करून नदीच्या विस्तीर्ण पात्रात 221 मीटर लांबीची वैशिष्ट्यपूर्ण साडी अर्पण करण्यात आली. ही साडी म्हणजे कौंडण्यपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील जनतेची जीवनवाहिनी असलेल्या नदीप्रती कृतज्ञतेची भावना आहे. त्यामुळे या नदीचे पावित्र्य जपून ती प्रदूषित होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी आणि पाण्याच्या या स्रोताचे जतन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यात दुष्काळाचे सावट असून 310 तालुके दुष्काळसदृश जाहीर करण्यात आले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी महोत्सवात आलेल्या प्रत्येक भाविकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि आपापल्या गावात जलसंवर्धनाच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. या सोहळ्याला लोकप्रतिनिधी, संत-महंत आणि भाविक मोठ्या संख्येने हजर होते.
310 तालुके दुष्काळसदृश जलसंवर्धनाचा घ्या संकल्प -राज्यातील तब्बल 310 तालुके सध्या दुष्काळसदृश जाहीर झाले असून पाण्याचे संकट गडद झाले आहे. या परिस्थितीत अंबा-रुक्मिणी महोत्सवातील सर्व भक्तांनी आणि नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा. तसेच आपापल्या गावातील आणि परिसरातील जलसंवर्धनाच्या कामात पुढाकार घेऊन सहभाग नोंदवण्याचा संकल्प करावा, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
हिवाळी अधिवेशनात विकास आराखड्यावर विशेष बैठक
विदर्भाचे श्रद्धास्थान असलेल्या कौंडण्यपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या कामांचा आढावा घेण्यासाठी आणि निधी व अंमलबजावणीला गती देण्यासाठी नागपूरच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विशेष बैठक घेतली जाईल. यामुळे रखडलेली सर्व विकासकामे लवकरच प्रत्यक्षात उतरतील, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.





