प्रियकराकडून 45 वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्या
लिव्ह-इन नात्याचा अत्यंत भयानक दुर्दैवी अंत

परतवाड्याच्या मेमना गावात घडला घात-पात
पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
परतवाडा /23 नोव्हेंबर- परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगाव गढी लगत असलेल्या मेमना गावात अनैतिक आणि लिव्ह-इन नात्यातून 45 वर्षीय महिलेचा डोक्यात जड वस्तूने प्रहार करून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. या रक्तरंजित थरारात बुंदी राजमा कासदेकर (वय 45) हिचा जागीच तडफडून मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आरोपी प्रियकर नितेश हिरा कासदेकर (वय 36) याला ताब्यात घेतले असून त्याची कसून उलटतपासणी सुरू केली आहे.
मेमना गावात सोमवार सकाळी 9 वाजताच्या सुमारास हा रक्तरंजित थरार समोर येताच संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. मृत महिला बुंदी कासदेकर आणि संशयित आरोपी नितेश कासदेकर हे दोघे गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून या गावात पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते. आज सकाळच्या सुमारास आरोपीने धारदार शस्त्राने महिलेच्या डोक्यावर घाव घातला. हा प्रहार इतका भीषण होता की तिचे डोके फुटून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि तिचा जागीच अंत झाला. सकाळी गावातील काही नागरिकांना या प्रकाराची कुण-कुण लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील रक्ताचा सडा आणि महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह पाहून गावकर्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या हत्याकांडाची माहिती गावात आणि आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांवर वार्यासारखी पसरली. घटनेचे वृत्त कळताच मृत महिलेच्या नातेवाइकांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या भीषण हत्याकांडाची वर्दी मिळताच परतवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि गुन्हे अन्वेषण पथकाचे तज्ज्ञ तातडीने मेमना गावात दाखल झाले. घटनास्थळावरील तणावपूर्ण परिस्थिती आणि नातेवाइकांचा संताप पाहून पोलिसांनी तात्काळ अतिरिक्त कुमक मागवून गावात कडेकोट बंदोबस्त तैनात केला. गुन्हे अन्वेषण तज्ज्ञांनी घटनास्थळाचा इंचन् इंच पिंजून काढत रक्ताचे नमुने, बोटांचे ठसे आणि इतर महत्त्वाचे तांत्रिक पुरावे गोळा केले. पोलिसांनी रीतसर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. या नृशंस हत्याकांडामुळे मेमना गावासह संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून प्रत्येक धागादोरा तपासला जात आहे.
खुना मागील नेमका हेतू शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान-मृत महिला आणि संशयित आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून एकत्र नांदत असताना नेमका असा कोणता वाद उफाळून आला की थेट जीव घेण्यापर्यंत मजल गेली. यामागे काही अनैतिक संबंधांचा संशय होता की आर्थिक देवाणघेवाणीतून हा खून झाला, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. आरोपीच्या कबुलीजबाबानंतरच या खुनामागील खरे गुपित उलगडणार आहे.
फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे सखोल पोलीस तपास सुरू-घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे अन्वेषण पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे भौतिक पुरावे जप्त केले असून ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. परिसरातील शेजारी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तांत्रिक तपास आणि पुराव्यांची सांगड घालून आरोपीविरुद्ध भक्कम दोषारोपपत्र तयार करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.





