भुसावळ-सिकंदराबाद विशेष रेल्वे धावणार
गर्दीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

अमरावती/ दि 23 – दिवाळी आणि छठ सणानिमित्त रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. भुसावळ-सिकंदराबाद दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार असून, सुरत-अमरावती आणि उधना-अमरावती विशेष गाड्यांना कायमस्वरूपी अतिरिक्त शयनयान श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे अमरावतीसह विदर्भातील प्रवाशांना गर्दीच्या काळात प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे.
भुसावळ-सिकंदराबाद विशेष रेल्वे क्रमांक 01285 भुसावळहून 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10 वाजता सिकंदराबादला पोहोचेल. ही गाडी मलकापूर, शेगाव, अकोला, हिंगोली, पूर्णा, नांदेड, मुदखेड आणि निजामाबाद या स्थानकांवर थांबणार आहे. गाडीला एकूण 20 डबे असून, त्यात 18 सामान्य द्वितीय श्रेणीचे आणि 2 एसएलआर डबे असतील. प्रवाशांना अनारक्षित तिकिटांवर प्रवास करता येणार आहे. गाडीचे थांबे आणि वेळापत्रक रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. सुरत-अमरावती विशेष गाडीला 22 नोव्हेंबरपासून, तर अमरावती-सुरत गाडीला 23 नोव्हेंबरपासून अतिरिक्त शयनयान डबा जोडण्यात येणार आहे. उधना-अमरावती विशेष गाडीतही 23 नोव्हेंबरपासून अतिरिक्त डबा राहणार असून, दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संख्या 17 होणार आहे. या बदलामुळे सणासुदीला प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होणार आहे.
भुसावळ-सिकंदराबाद विशेष गाडीमुळे मराठवाडा आणि तेलंगणातील प्रवाशांना फायदा होणार आहे. तर सुरत, उधना आणि अमरावती मार्गावरील गाड्यांना अतिरिक्त शयनयान डबे जोडल्याने प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. सणांच्या काळात रेल्वे प्रवासाचे नियोजन करणार्यांसाठी मध्य रेल्वेचा हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.





