शिक्षकांना पुन्हा 34 दिवस जनगणनेची कामगिरी

पहील्या टप्प्यानंतर 25 जाने.पासून घरोघरी होणार मोजणी

मुख्याध्यापकांकडून मागविली सर्व शिक्षकांची सविस्तर माहिती

अमरावती /23 नोव्हेंबर- जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता पंचवीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस या काळात दुसरा टप्पा पार पडणार असून यासाठी शिक्षकांना पुन्हा चौतीस दिवस घरोघरी जावे लागणार आहे. या मोजणीसाठी खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची नेमणूक केली जाणार असून त्यापूर्वी त्यांचे विशेष प्रशिक्षण घेतले जाणार आहे.
नवीन वर्षात शिक्षकांवर जनगणनेच्या कामाची मोठी जबाबदारी येणार आहे. या दुसर्‍या टप्प्यात घरमोजणी झालेल्या घरांमध्ये नेमके किती लोक राहतात याची अचूक माहिती गोळा करावी लागणार आहे. हे राष्ट्रीय काम असल्याने ज्या शिक्षकांची प्रगणक म्हणून नेमणूक होईल त्यांना हे कर्तव्य पार पाडावेच लागणार आहे. कामाचा व्याप मोठा असल्याने सर्वच शाळांमधील बहुतांश शिक्षक आणि इतर विभागांतील कर्मचार्‍यांची यासाठी नियुक्ती केली जाणार आहे. या कामासाठी प्रगणक नेमण्याकरिता प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांकडून शिक्षकांची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. यामध्ये शिक्षकांचे नाव, पदनाम, भ्रमणध्वनी क्रमांक, संगणकीय टपाल पत्ता, लिंग, वय, पॅन व आधार क्रमांक तसेच शाळेचे नाव आणि पत्ता अशी सर्व माहिती संकलित करण्यात आली आहे. जनगणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या संपूर्ण माहितीची पुन्हा फेरतपासणी सुद्धा केली जाणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षकांची मोठी धावपळ उडणार असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे.

परीक्षेनंतर लागणार शिक्षकांच्या प्रशिक्षणाची लगबग
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणी पुढच्या महिन्यात घेण्याचे निश्चित केले आहे. दोन डिसेंबरला पहिली भाषा, तीन डिसेंबरला गणित आणि पाच डिसेंबरला इंग्रजी विषयाचा पेपर होणार आहे. ही परीक्षा संपून उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण होताच एकवीस डिसेंबर ते दहा जानेवारी या काळात सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे.

Back to top button