जिल्ह्यातील 179 उत्कृष्ट मंडळांचा दिमाखदार गौरव
पोलीस दलाचा उपक्रम अन् उत्सवाचा सन्मान

* नियम पाळणार्या कार्यकर्त्यांचे पोलिसांकडून कौतुक
* पारंपरिक वाद्यांचा गजर अन् पर्यावरण रक्षणाचा संदेश
* सामाजिक बांधिलकी जपत साजरा झाला यंदाचा उत्सव
अमरावती/23 नोव्हेंबर – जिल्ह्यात यंदाचा गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव मोठ्या शांततेत अन् सामाजिक बांधिलकी जपत पार पडला. अमरावती ग्रामीण पोलीस दलाने घेतलेल्या स्पर्धेतून जिल्ह्यातील तब्बल 179 मंडळांची उत्कृष्ट मंडळे म्हणून निवड झाली असून, या सर्व मंडळांचा उपविभाग स्तरावर प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन आज दिमाखदार गौरव करण्यात आला. ध्वनीमर्यादेचे पालन, पारंपरिक वाद्यांचा वापर आणि समाजोपयोगी उपक्रम राबवणार्या मंडळांनी यंदा बाजी मारली आहे.
अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या उत्सवाच्या काळात उत्कृष्ट गणेश मंडळ आणि उत्कृष्ट दुर्गा मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सण-उत्सव केवळ धामधुमीत साजरे न होता त्यातून समाजप्रबोधन व्हावे, स्वच्छता राहावी आणि गावागावांत एकोपा नांदावा, या चांगल्या हेतूने पोलीस दलाने हे पाऊल उचलले होते. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अनेक मंडळांनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी शंभर गुणांची एक खास तपासणी पद्धत ठरवण्यात आली होती. त्यामध्ये परवानगीच्या नियमांचे पालन, वीज आणि आगीपासून सुरक्षेची काळजी, गर्दीचे तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन आणि आपत्कालीन काळातील तयारी या बाबी प्रामुख्याने तपासल्या गेल्या. त्यासोबतच रक्तदान, आरोग्य तपासणी आणि नेत्रदान शिबिरे घेऊन गरजू लोकांना मदत करणार्या मंडळांना प्राधान्य देण्यात आले. महिला व लहान मुलांची सुरक्षा, प्लास्टिक टाळून पर्यावरणाचे रक्षण करणे, झाडे लावणे, पाणी आणि वीज वाचवणे तसेच व्यसनमुक्तीचा संदेश देणारे देखावे उभारणार्या मंडळांचे विशेष कौतुक झाले. अपंग बांधवांसाठी रॅम्पची सोय आणि नागरिकांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणार्या कार्यकर्त्यांच्या कामाचीही नोंद घेण्यात आली.
उत्सवाच्या दिवसांत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा पाळणार्या आणि वेळेचे भान ठेवणार्या मंडळांना मोठे महत्त्व दिले गेले. मोठ्या आवाजाच्या वाद्यांचा किंवा डीजेचा वापर टाळून आपल्या पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढणार्या मंडळांनी आपली संस्कृती जपण्याचा मोलाचा संदेश दिला. दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करणार्या, वाहतुकीला अडथळा आणणार्या, मालमत्तेचे नुकसान करणार्या तसेच दारू किंवा तंबाखूजन्य पदार्थांना प्रोत्साहन देणार्या मंडळांचे गुण वजा करण्यात आले. या सर्व कडक तपासणीतून जिल्ह्यातील 89 गणेश मंडळे आणि 90 दुर्गा मंडळे अशी एकूण 179 मंडळे उत्कृष्ट ठरली. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांनी या संपूर्ण उपक्रमाची माहिती दिली असून, पोलीस आणि नागरिक यांच्यातील नाते अधिक घट्ट करणार्या सर्व मंडळांचे पोलीस दलाने मनापासून अभिनंदन केले आहे. पुढील काळातही नागरिकांनी असेच शांततेत आणि पर्यावरणाची काळजी घेत सण साजरे करावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
तरुणांसाठी सुरक्षा कवच व जनजागृती मोहीम
पोलिसांच्या सुरक्षा कवच मोहिमेत सहभागी होऊन अनेक मंडळांनी तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी मोठे प्रबोधन केले. दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे, वाहतूक नियमांचे पालन करणे, महिला व बालकांची सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याबाबत गावागावांत माहिती दिली गेली. अडचणीच्या काळात 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे महत्त्वही नागरिकांना समजावून सांगितले गेले.





