बेकायदेशीर मूल खरेदी करणार्यांची गय नाही
अवैध दत्तक प्रकरणावर जिल्हा प्रशासनाचा कडक इशारा

केंद्रीय दत्तक प्राधिकरणाद्वारेच राबवा दत्तक प्रक्रिया
अमरावती/23 नोव्हेंबर – शहरात लहान मुलांची विक्री व मानवी तस्करीच्या घटना समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने बाल सुरक्षेबाबत अत्यंत कठोर पावले उचलली असून, कायदेशीर प्रक्रियेशिवाय किंवा मध्यस्थांमार्फत मूल दत्तक घेणे हा गंभीर गुन्हा असल्याचा सणसणीत इशारा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून अथवा पैशांची देवाणघेवाण करून मुलांचे हस्तांतरण करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, इच्छुक पालकांनी केवळ शासकीय अधिकृत संकेतस्थळाद्वारेच दत्तक प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शहरात मुलांच्या खरेदी-विक्रीचे प्रकार उघडकीस आल्याने जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मूल दत्तक घेण्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करणे, दलाल किंवा मध्यस्थांमार्फत मूल ताब्यात घेणे आणि खासगी कराराच्या आधारे मुलांची देवाणघेवाण करणे कायद्याने मोठा गुन्हा आहे. अनाथ, निराधार व कायदेशीररीत्या दत्तक देण्यासाठी उपलब्ध असलेल्या बालकांना हक्काचे घर, प्रेम आणि सुरक्षित संरक्षण मिळावे हा या व्यवस्थेचा मुख्य हेतू आहे. मात्र, या प्रक्रियेचा गैरफायदा घेत काही मंडळी पैशांच्या जोरावर व खोट्या कागदपत्रांच्या आधारे मुलांची ने-आण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही अनधिकृत व्यक्ती, दलाल किंवा मध्यस्थांच्या माध्यमातून मूल घेणे कायद्याला मान्य नाही. पैशांच्या बदल्यात बाळाचा ताबा घेणे, बनावट जन्म दाखला तयार करणे, चुकीची जन्म नोंदणी करणे अथवा खासगी करारावर दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. जन्म प्रमाणपत्र किंवा खासगी करारनामा हा कधीही न्यायालयीन दत्तक आदेशाची जागा घेऊ शकत नाही. केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या माध्यमातूनच संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाते. बाल न्याय अधिनियम 2015 व दत्तक विनियम 2022 नुसार इच्छुक व पात्र पालकांनी या प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीनंतर पालकांची पात्रता तपासणी, गृह चौकशी, बाळाची कायदेशीर उपलब्धता, सामाजिक व वैद्यकीय तपासणी अहवाल तसेच नियमानुसार न्यायालयीन दत्तक आदेशाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. दरम्यान, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गरुड तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकार्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
बनावट दत्तक व्यवहारांवर करडी नजर ठेवणार
मूल दत्तक घेणे म्हणजे केवळ एखाद्या कुटुंबाची हौस भागवण्याचे साधन नसून, एका निरागस जीवाला सुरक्षित भविष्य आणि मायेचे घर देण्याची मोठी जबाबदारी आहे. मुले ही कोणतीही वस्तू नाहीत, जिची पैशांच्या बदल्यात खरेदी-विक्री केली जाईल. काही लोक दलालांमार्फत किंवा बनावट कागदपत्रे तयार करून मूल पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात. असा प्रकार अत्यंत गंभीर गुन्हा असून त्यात सहभागी असणार्या कोणाचीही गय केली जाणार नाही. नागरिकांनी फसव्या आमिषांना बळी न पडता केवळ केंद्र शासनाच्या अधिकृत दत्तक संकेतस्थळावर नोंदणी करून कायदेशीर मार्गानेच मूल दत्तक घ्यावे. प्रत्येक बालकाला सुरक्षित कुटुंब व उज्ज्वल भविष्य मिळवून देण्यासाठी नियमांचे पालन करणे ही आपल्या सर्वांचीच नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे.
– आशिष येरेकर (जिल्हाधिकारी, अमरावती)





