राऊतांच्या आरोपांत तथ्य नाही, अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
राहुल नार्वेकरांचा पलटवार

मुंबई/23 नोव्हेंबर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अलिबागच्या म्हात्रोळी गावातील गरीब आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा गंभीर आरोप खासदार राऊतांनी केला असून यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. या सर्व आरोपांवर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊतांच्या आरोपामध्ये काहीही तथ्य नसून 2024 पर्यंतच्या सर्व तक्रारींचा निपटारा आधीच झाला आहे. असे म्हणत नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्या आरोपांवर बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, राऊतांच्या आरोपांवर काहीही तथ्य नाही. ज्या जमिनीवरून आरोप केले जात आहेत, ती आदिवासी जमीन नसून भोगवटा क्रमांक 1 ची जमीन आहे. आदिवासींनी 2024 पूर्वी केलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा झाला आहे. 2024 पर्यंत झालेल्या तक्रारींमध्येही कुठेही नार्वेकर कुटुंबाचा नावाचा उल्लेख नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 2024 पर्यंत जमिनीची मालकी बलदेवसिंह जाला यांच्याकडे होती. पत्नीने ही जमीन बलदेवसिंह जाला यांच्याकडून 2024नंतर विकत घेतली आहे. संबंधित तक्रारींबाबत जाला यांनी या घरांऐवजी पर्यायी जागेवर आदिवासींना पक्के घरे बांधून दिली आहेत. सोबतच, आदिवासी बांधवांना पैसे आणि बोअरवेलदेखील दिली आहे. या पुनर्वसनानंतर आदिवासी बांधवांनी कोणतीही तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते, असेही ते यावेळी म्हणाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक जीवनात वावरताना किमान मर्यादांचे पालन केले पाहिजे हे आपणही मान्य कराल. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांच्या मनमानी वर्तनाविरोधात अलिबाग तालुक्यातील आदिवासी समाज गेल्या काही काळापासून आंदोलन करीत आहे. पोलीस यंत्रणा त्या आदिवासींवर जबरदस्ती करत त्यांना पळवून लावत आहेत. हे सर्व विधानसभा अध्यक्षांच्या दबावाखाली घडत असेल तर नार्वेकर यांना त्यांच्या पदावरून तत्काळ दूर करणे गरजेचे आहे. राहुल नार्वेकर आणि त्यांचे नगरसेवक भाऊ मकरंद यांनी गेल्या काही काळापासून अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदीचा सपाटा चालवला आहे. असा गंभीर आरोप त्यांनी केला.





