दुष्काळी भागातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी जोमाने काम करा

एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई/23 नोव्हेंबर  : राज्यातील दुष्काळाची दाहकता पाहता दुष्काळी भागातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी जोमाने काम करा, असे निर्देश शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्षांना दिले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज (23 नोव्हेंबर) शिवसेना नगराध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत नगर परिषदेतील विकास कामे, प्रशासनातील अडचणी आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नगर परिषदांच्या निवडणुकीत शिवसेनेचे 63 नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि हजारो नगरसेवक निवडू न आले. हे शिवसेनेच्या इतिहासातील मोठं यश आहे. आजच्या शिबीरामुळे नगर परिषदांमधील वस्तुस्थिती समोर आली, त्यानुसार नगरविकास विभाग सहकार्य करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित नगराध्यक्षांना दिली. शासन आपल्या दारीच्या धर्तीवर शिवसेना नगराध्यक्ष आपल्या दारी उपक्रम राबवेल. यातून नगराध्यक्षांनी घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या दूर कराव्यात, असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच इतर पक्षाच्या नगरसेवकांबाबत पक्षीय मतभेद न ठेवता नगराध्यक्षांनी सगळ्यांना सोबत घेऊन नगराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले. दुष्काळी भागात ताकदीनं काम करा. बळीराजाला सावरण्यासाठी लाखो हात पुढे आले पाहिजे, असे ते म्हणाले. किर्तनकारांच्या माध्यमातून चिंताक्रांत शेतकर्‍यांचे कौन्सिलिंग करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. युवकांसाठी अभ्यासिका, खेळाची मैदाने आणि त्यांना व्यासपीठ देण्यासाठी आवश्यक प्रकल्प हाती घेण्याच्या सूचना त्यांनी नगराध्यक्षांना केल्या. नमो उद्यानाप्रमाणेच नगर परिषदांच्या क्षेत्रात खेळांच्या मैदानांसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलीबाळींची लग्न ठरलेली आहेत, मात्र दुष्काळामुळे ती थांबलेली आहेत. शेतकरी चिंतेत आहे, मात्र दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांची लग्नाची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गडकोटांवर स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात ज्या उपाययोजना केल्या त्याप्रमाणे गडकोटांवर संविधान दिन साजरा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. कमी बोला आणि जास्त काम करा, असा सल्ला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाच्या आमदारांना दिला.

Back to top button