दोघांच्या मृत्यू प्रकरणात 23 वर्षांनंतर खुनाचा गुन्हा

अमरावतीच्या विशेष सीबीआय न्यायालयाचे आदेश

* एलसीबी प्रमुखासह सहा पोलिस अधिकारी कर्मचार्‍यांवर आरोप!

यवतमाळ /24 नोव्हेंबर : शहरात एप्रिल 2003 मध्ये बजाज यांच्या घरी मोठा दरोड पडला होता. या प्रकरणात पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या दोघांचा 1 मे 2003 रोजी पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला.
या घटनेत तत्कालीन पोलिस अधीक्षक अमितेश कुमार यांच्यासह पोलिस अधिकारी-कर्मचारी यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला. घटनेचा सीबीआयने तपास केले. सोबतच राज्य मानवअधिकार आयोग, व औरंगाबाद येथील पोलिस अधीक्षक राजेंद्र सिंह यांनही तपास केला. मृतकाच्या परिवाराने या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई केली जावी, अशी मागणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडे केली. न्यायालयाने तब्बल 23 वर्षांनंतर या गुन्ह्यात सहा पोलिस अधिकार्‍या विरोधात खुनाच्या गुन्ह्याचा खटला चालविण्याचे निर्देश दिले आहेत.
अजय मधुकर मोहिते (19, रा. यवतमाळ), सुरेश रामभाऊ सोनकुसरे (21,रा.घुई, ता. नेर) अशी पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. पोलिसांनी बेदम मारहाण करून त्यांना विष पाजून ठार केल्याचा आरोप करण्यात आला होता. सीबीआयने केलेल्या तपासात या प्रकरणात तत्कालीन पोलिस अधीक्षक अमितेश कुमार इतर चार यांच्या सहभाग नसल्याचे स्पष्ट केले. तर उर्वरित सहा जणांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला होता. मात्र या गुन्ह्यात हत्येचा आरोपाखालीच खटला चालविण्यात यावा, अशी याचिका मधुकर मोहिते, शैलेश ठाकूर यांनी सीबीआय विशेष न्यायालय अमरावती यांच्याकडे केली.त्यांच्यावतीने अ‍ॅड. प्रशांत देशपांडे यांनी न्यायालयात बाजू मांडली. विशेष न्यायाधीश अमित जोशी यांनी अर्ज निशानी 55 मंजूर करून दोषारोपपत्रात दाखल आरोपी संदर्भात भारतीय दंड संहिता कलम 302 सहवाचता कलम 34 अन्वये दोषारोप समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. तसेच दोषारोपांना समोर जाण्यासाठी सहा जणांनी न्यायालयात उपस्थित राहावे, असे निर्देश दिले आहेत.सीबीआयने सादर केलेल्या दोषारोप पत्रानुसार यामध्ये तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलिस निरीक्षक दिलदार तडवी, पोलिस उपनिरीक्षक दोनकलवार, गवई, पोलिस शिपाई प्रभाकर काळे, शकील, गणपत गिनगुले यांच्यावर ठपका ठेवला आहे. आता त्यांच्या विरुद्ध संगणमताने खुन केल्याच्या आरोपात खटला चालणार असल्याचे अ‍ॅड. प्रशांत देशपांडे यांनी सांगितले. तत्कालिन एसपीसह चौघांची होणार चौकशी-तत्कालीन पोलिस अधीक्षक अमितेश कुमार यांच्यासह चौघांची चौकशी होणार आहे. सीआयडी, मानवाधिकार आयोग, न्यायदंडाधिकारी यांचा अहवाल न्यायालयापुढे सादर करण्याचे निर्देश सीबीआयला दिले आहे.

Back to top button