यवतमाळात ‘ईडी’चे 9 ठिकाणी एकाच वेळी छापे
242 कोटींच्या कथित बँक गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई

बँकेच्या सर्व अधिकार्यांसह थकीत कर्जदारांवर गुन्हे दाखल
यवतमाळ/1ऑक्टोबर : येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील 242 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार आणि त्यातून झालेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाला गुरुवारी निर्णायक वळण मिळाले.
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई विभागाच्या पथकाने आज गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यात सुमारे नऊ ठिकाणी एकाच वेळी झडती घेतली. बँकेचे तत्कालीन अधिकारी, कर्मचारी आणि कर्जदारांशी संबंधित ठिकाणांचा या कारवाईत समावेश असल्याचे अधिकार्यांच्या हवाल्याने वृत्त आहे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) सुरू असलेल्या तपासाचा भाग आहे.बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा तपास हाती घेतला आहे. बँकेतील कर्जवाटप, कर्जाची रक्कम वळविणे आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक व्यवहारांची साखळी तपासली जात असल्याचे अधिकार्यांनी सांगितले आहे.
विशेष लेखापरीक्षणातून गैरव्यवहार उघडकीस-बँकेतील गैरव्यवहार आणि ठेवीदारांच्या पैशांच्या कथित गैरवापराबाबत तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने बँकेचे विशेष लेखापरीक्षण केले होते. या लेखापरीक्षणात बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, संचालक आणि अन्य अधिकार्यांनी कर्जदार, मूल्यांकनकार आणि लेखापरीक्षकांच्या संगनमताने नियमांचे उल्लंघन करून कर्जवाटप केल्याचे आढळल्याचा आरोप आहे. अनेक कर्जप्रकरणांमध्ये पुरेसे तारण नसतानाही कर्ज मंजूर करण्यात आल्याचे तसेच कर्जदारांच्या परतफेडीच्या क्षमतेचे योग्य मूल्यमापन करण्यात आले नसल्याचे तपासात समोर आल्याचे अधिकार्यांनी सांगितले आहे. विशेष लेखापरीक्षणात बँकेच्या माध्यमातून सुमारे 242 कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले होते. 2024 मध्ये या प्रकरणात बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळासह अधिकारी, कर्मचारी, कर्जदार, मूल्यांकनकार आणि लेखापरीक्षकांविरोधात गुन्हे दाखल झाल्याचेही नोंदविण्यात आले आहे.





