विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा 3-1-1 चा फॉर्म्युला ठरला

शिंदेंच्या शिवसेनेतून माजी आ. श्रीकांत देशपांडे रिंगणात

पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास शिक्षक आघाडीकडून लढणार

अमरावती /1ऑक्टोबर  : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून चार जिल्ह्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी महायुतीने 3-1-1 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.
महायुतीने या निवडणुकीसाठी जोरदार तयार सुरू केली आहे. अशातच आता एकीकडे महायुतीच्या फॉर्म्युल्याची माहिती समोर आल्यानंतर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने अमरावती शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज सुद्धा भरल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, शिंदेंच्या या नेत्याने पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन्ही अर्ज भरल्याने त्यांच्या बंडखोरीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नसतानाही आपला अर्ज भरला आहे. मी 1992 पासून शिवसेनेत कार्यरत आहे आणि पहिल्या दिवसापासून शिंदे सेनेत आहे, असे म्हणतश्रीकांत देशपांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना माजी आमदार श्रीकांत देशपांडे म्हणाले की, मी 1992 पासून शिवसेनेत कार्यरत आहे आणि पहिल्या दिवसापासून शिंदे सेनेत आहे. त्यामुळे पक्षाच्या तिकिटावर माझाच पहिला अधिकार आहे. म्हणूनच मी पहिला अर्ज पक्षाकडून तर दुसरा अपक्ष म्हणून दाखल केला आहे. कारण जर पक्षाने उमेदवारी नाकारली तरीही मी निवडणुकीतून माघार घेणार नाही. उमेदवारी मिळणे हा माझा हक्क आहे. ती मिळाली नाही तर शिक्षक आघाडी या संघटनेच्या बॅनरखाली निवडणूक लढवेन, असे श्रीकांत देशपांडे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

Back to top button