पुणे विमानतळावर इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग

गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने उडाली खळबळ

पुणे /15 नोव्हेंबर: पुण्यातून गुवाहाटीला जाणार्‍या इंडिगो विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये (अंडरकॅरेज) बिघाड झाल्याने रविवारी (15 नोव्हेंबर) पुणे विमानतळावर काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, हे विमान सकाळी नऊ वाजून चार मिनिटांनी पुन्हा पुणे विमानतळावर उतरवण्यात आल्याने सर्व 192 प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप असल्याचे पुणे विमानतळ प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
इंडिगो कंपनीच्या 6-ई-0623 (व्हीटी-आयझेडई) विमानाने पुणे विमानतळावरून गुवाहाटीकडे रविवारी सकाळी उड्डाण केले. टेकऑफनंतर लँडिंग गिअर आत (रिट्रॅक्ट) जाणे अपेक्षित असते. या वेळी मात्र इंडिगोच्या विमानाचे लँडिंग गेअर बाहेरच अडकून राहिले. टेकऑफ झाल्यानंतर थोड्याच वेळात विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. पायलटने ही माहिती तातडीने एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) दिली. विमानाच्या लँडिंग गेअरमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळताच पुणे विमानतळ प्रशासन, एटीसी, इंडिगो आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने सुरक्षा उपाययोजनांसाठी प्रयत्न सुरु केले. भारतीय हवाई दलाने (आयएएफ) संपूर्ण विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली. त्यानंतर अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन पथकांना सज्ज ठेवण्यात आले.
सावधगिरीचा उपाय म्हणून इंडिगोच्या या विमानाने आधी धावपट्टीवरून लो पास घेतला. त्यामुळे पायलटला लँडिंग गिअरची नेमकी स्थिती पाहता येणे शक्य होते. सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांची तपासणी केल्यानंतर पुणे या विमानाचे पुणे विमानतळावरच पुन्हा लँडिंग करण्यात आले.लँडिंगनंतर विमानाला तीन अग्निशमन गाड्या आणि दोन रुग्णवाहिकांच्या ताफ्यात ‘बे-नंबर 7’वर नेण्यात आले. विमान आणि प्रवासी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी नऊ वाजून 10 मिनिटांनी एटीसीकडून जाहीर करण्यात आलेली आपत्कालीन परिस्थिती मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. इंडिगोच्या या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून 192 जण होते. सर्वजण सुखरूप असून, कोणालाही दुखापत झाली नसल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अडकलेल्या प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी इंडिगोने बंगळुरूहून पुण्याला पर्यायी विमान पाठवण्याची व्यवस्था केली आहे. त्या विमानाने प्रवासी गुवाहाटीला रवाना होणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.दरम्यान, पुणे विमानतळ प्रशासनाने भारतीय हवाई दल, एटीसी, इंडिगो आणि इतर यंत्रणांच्या समन्वयातून ही संपूर्ण मोहीम यशस्वीपणे पार पाडली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

Back to top button