नारवाटी येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळेचे उद्घाटन

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने

धारणी येथे आदिवासी विकास विभागाचा भव्य सोहळा; आ.केवलराम काळे यांची प्रमुख उपस्थिती

अमरावती / 15 नोव्हेंबर : आदिवासी समाजाचे महानायक, थोर स्वातंत्र्यसेनानी तथा क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिनानिमित्त रविवार, 15 नोव्हेंबर रोजी धारणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.धारणी तालुक्यातील नारवाटी गावात उभारण्यात आलेल्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेचे आभासी पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .
जनजातीय गौरव दिवसानिमित्ताने राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांच्या वतीने नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला.यावेळी मेळघाटचे आमदार केवलराम काळे,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ,माजी आमदार प्रभुदास भिलावेकर सह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची उपस्थित होते.
आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना,शैक्षणिक प्रगती, सामाजिक सक्षमीकरण आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीविरुद्ध संघर्ष करून आदिवासी समाजात स्वाभिमान, एकता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण केली. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे आदिवासी समाजाच्या इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा जनजातीय गौरव दिन हा केवळ उत्सव नसून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचा संकल्प असल्याचे या आयोजनातून अधोरेखित करण्यात आले. यानंतर धारणी येथील जयस्तंभ चौक येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून पूजन करण्यात आले. दुपारी प्रशासकीय इमारत येथील सभागृहामध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा संदेश या गौरव दिनाच्या निमित्ताने देण्यात आला.

Back to top button