लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99 टक्के मतदान
उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला

लातूर/15 नोव्हेंबर : दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमधील जिल्हा बँकेची निवडणूक सध्या चर्चेत आहे. जिल्हा बँकेतील संचालकांच्या 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी आज 99.4 टक्के मतदान झाले. येथे 999 पैकी 993 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून उद्या मतमोजणी होणार आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल आणि महायुतीचे परिवर्तन पॅनेल यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेते धीरज देशमुख आणि भाजप नेते तथा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी महायुतीच्या नेतृत्वातील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनल विरुद्ध महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. या मतदान प्रक्रियेत अनेक दिग्गजांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. लातूर येथील मतदान केंद्रावर लातूर ग्रामीण भाजपाचे आमदार रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिक्षक आमदार विक्रम काळे आणि काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनीही बजावला मतदानाचा हक्क आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रांवर झालेल्या या मतदान प्रक्रियेत तब्बल 99.40 टक्के मतदानाची नोंद झाली. दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी उद्या लातूर येथे होणार असून, सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यामुळे मतदारांनी महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलला की महायुतीच्या परिवर्तन पॅनेलला कौल दिलाय, याबाबतचे चित्र उद्याच स्पष्ट होणार आहे.





