बॉलिवूडच्या अभिनेत्यावर गोळीबाराचा कट उधळला
मुंबईत लपला होता आरोपी, शूटर्स अटकेत

मुंबई/15 नोव्हेंबर: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका कारवाईत दोन संशयित शूटर्सना अटक केल्याने मोठा अनर्थ टाळला आहे. या दोघांनी मुंबईत एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यावर आणि दिल्लीत एका व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा कट रचला होता. पकडलेला एक आरोपी हा पंजाबमधील एका इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरच्या हत्या प्रकरणात आरोपी आहे.
पकडलेल्या दोन आरोपींपैकी एक असलेला दीपक सिंग उर्फ दीप हा अमृतसरमध्ये झालेल्या मॅड संधू याच्या हत्या प्रकरणात वॉण्टेड होता. दीपक आणि त्याचा साथीदार पलविंदर उर्फ काका यांनी परदेशात बसलेल्या एका गँगस्टरच्या सांगण्यावरून हा हल्ला केला होता. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी पलविंदरला आधीच अटक केली असून, दीपक मुंबईत लपून बसला होता.परदेशात बसलेल्या त्याच गँगस्टरने दीपकला मुंबईतच राहून एका बॉलिवूड अभिनेत्यावर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. 1984 मध्ये त्या अभिनेत्याने केलेल्या कथित शिख विरोधी वक्तव्याचा बदला घेण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. महत्त्वाचे याच गँगस्टरने विकासलाही या अभिनेत्यावर हल्ल्याची सुपारी दिली होती. मात्र, पोलिसांनी अभिनेत्याचे नाव उघड केलेले नाही.दुसरा आरोपी विकास ठाकूर उर्फ विक्की हा मुंबईहून दिल्लीत पोहोचला होता. खंडणीच्या वसुलीसाठी दिल्लीतील एका बड्या व्यावसायिकावर गोळीबार करण्याचे काम त्याला देण्यात आले होते. विकासनेच दीपकची ओळख त्या परदेशातील गँगस्टरशी करून दिली होती. दीपक मुंबईतून दिल्लीत येऊन विकासला या कटात मदत करणार होता पण त्याआधीच स्पेशल सेलने दोघांना अटक केली. 3 नोव्हेंबर रोजी विकासच्या अटकेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.





