राहुल गांधींकडून भारताची बदनामी
देशाला बदनाम करून सत्ता मिळणार नाही

पुढील 30 वर्षे काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावं लागणार
अमित शाहांचा हल्लाबोल
पुणे/15 नोव्हेंबर: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस पक्ष गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने राजकीय पराभवाचा सामना करत आहे. या नैराश्यातूनच काँग्रेस वेगवेगळ्या प्रकारे आपली नाराजी व्यक्त करत असल्याची टीका अमित शाह यांनी केली. फरिदाबाद येथे आयोजित कार्यक्रमात देशभरातून लोकांना बोलावण्यात आले होते. राहुल गांधीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर राहुल गांधी यांनी भारतविरोधी वक्तव्ये करून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अमित शाह यांनी केला.
काँग्रेसला निवडणुकीत यश मिळवायचे असेल, तर त्यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी करण्याऐवजी गावागावात जाऊन लोकांना भेटावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरात कौतुक होत असताना राहुल गांधी जागतिक व्यासपीठावर भारताच्या विकासाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका अमित शाह यांनी केली. भारताची लोकशाही, पंतप्रधान आणि देशाच्या प्रतिमेला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे उत्तर आगामी निवडणुकांमध्ये जनता देईल. राहुल गांधी यांनी अशा प्रकारे भारताची बदनामी सुरू ठेवल्यास पुढील 30 वर्षे काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागेल, असा टोला अमित शाह यांनी लगावला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही राहुल गांधी यांच्या या राजकारणामुळे पक्षाला निवडणुकीत फायदा होणार नाही, असे अमित शाह म्हणाले. काँग्रेसने परदेशात जाऊन भारतावर टीका करण्याऐवजी देशातील जनतेमध्ये जाऊन काम करावे, असा सल्ला देखील अमित शाह यांनी दिला.देशात 70 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केल्याचे मत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्या सत्ताकाळात महाराष्ट्रासह देशभरातील शेतकरी आणि सहकार क्षेत्रातून स्वतंत्र सहकार मंत्रालयाची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र, काँग्रेसने ही मागणी कधीही मान्य केली नाही असे शाह म्हणाले होते. केंद्रात भाजप आणि नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना झाली. जिल्हा सहकारी संस्था, दूध संघ आणि साखर कारखान्यांना बळकटी देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. साखर कारखान्यांना क रसवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने घेतल्याते ते म्हणाले. छठ महापर्व आणि भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन. छठ महापर्वानिमित्त अमित शाह यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा दिवस ’आदिवासी गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. नक्षलवादातून मुक्त झालेल्या भागांमध्येही विकासाची कामे करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे.
सहकारी संस्थांच्या कामकाजावर लक्ष
पुण्यात केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचा समावेश आहे. हे कार्यालय गुजरातमध्ये सुरू व्हावे, अशी तेथील सहकार क्षेत्रातील लोकांची इच्छा होती. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हे कार्यालय महाराष्ट्रातील पुण्यात सुरू करण्यासाठी आग्रह धरल्याचे शाह म्हणाले. पुण्यातील या कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र, गुजरात, दमण आणि दीव तसेच सिल्वासा येथील बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवले जाणार आहे.





