रविवार घातवार; पाच जणांचा मृत्यू
शेगावहून दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात

दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू
खामगाव/15 नोव्हेंबर : रविवारची सकाळ, दुपार आणि संध्याकाळ मृत्यूच्या सावटाखाली गेली. रस्त्यावरून प्रवासाला निघालेले पाच जण पुन्हा घरी परतलेच नाहीत. कुठे दुचाकीची ट्रकला धडक, तर कुठे एसटी बसची जोरदार धडक, तीन वेगवेगळ्या अपघातांनी पाच कुटुंबांतील आनंद हिरावून घेतला. या घटनांनी खामगाव परिसर सुन्न झाला आहे. पारखेड फाट्याजवळ दुचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर खामगाव-नांदुरा मार्गावर ट्रकच्या धडकेत एकाचा आणि खामगाव-चिखली मार्गावर एसटी बसच्या धडकेत आणखी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. एकाच दिवशी घडलेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांनी परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
खामगाव-मलकापूर मार्गावरील पारखेड फाट्याजवळ रविवारी रात्री 7.15 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. खामगावहून मलकापूरकडे जाणार्या एमएच-28-सीए-0341 क्रमांकाच्या दुचाकीला मागून आलेल्या वाहनाने धडक दिली. त्यामुळे दुचाकी समोरील ट्रकवर आदळली. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, दुचाकीस्वाराचे हेल्मेटही तुटून पडले. या दुर्घटनेत दिगंबर चंद्रकांत इंगळे (35), मयूर निवास होले (28) आणि परेश सुरेश घुले (18, तिघेही रा. मुक्ताईनगर तालुक्यातील घाणखेड व मलकापूर तालुक्यातील हरणखेड) यांचा मृत्यू झाला.
ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू
खामगाव-नांदुरा मार्गावरील तेजराव पवार यांच्या शेताजवळ 15 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 ते 6 दरम्यान ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. यात सुनील दशरथ इंगळे (42, रा. उटी खुर्द, ता. जळगाव जामोद) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक शंकरलाल बारेलाल गोंड (28, रा. जबलपूर, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
खामगाव-चिखली मार्गावरील गारडगाव शिवारातील पेट्रोलपंपासमोर दुपारी 1.30 वाजता हिरकणी एसटी बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात विजय उत्तमराव गवई (66, रा. लोखंडा, ता. खामगाव) गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.





