अंजनगाव तालुक्यात तिघांच्या आत्महत्यांनी खळबळ

कर्जाच्या ओझ्याने दोन युवा शेतकर्‍यांनी

मृत्यूला कवटाळले
शहरातील 28 वर्षीय युवकानेही घेतला गळफास

अंजनगाव सुर्जी/15 नोव्हेंबर : तालुक्यात आत्महत्यांच्या तीन घटनांनी परिसरात खळबळ उडाली आहे.तालुक्यातील काळगव्हाण येथील 28 वर्षीय युवा शेतकरी निखिल दिनेश चौधरी याने कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीला कंटाळून दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास गळफास घेतला.तर सातेगाव येथील युवा शेतकरी अमोल काळे याने खासगी फायनान्स कंपनीच्या कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून दिनांक 2 नोव्हेंबर रोजी विष प्राशन केले होते. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.याशिवाय शहरातील डीपी रोड परिसरातील 28 वर्षीय मयूर अशोकराव थोरात यानेही राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले.काळगव्हाण येथील निखिल चौधरी याच्या नावावर चार एकर शेती होती.सेंट्रल बँक ऑफ इंडिया,भंडारज शाखेचे कर्ज तसेच खासगी कर्ज मिळून त्याच्यावर सुमारे चार ते पाच लाख रुपये कर्ज असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.सततची नापिकी आणि आर्थिक अडचणींमुळे तो त्रस्त होता.अविवाहित असलेल्या निखिलच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे.घटनेच्या दिवशी दुपारी त्याने वडिलांना शेतात सोडले.त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली.दरम्यान,सातेगाव येथील युवा शेतकरी अमोल मुरलीधर काळे याने खासगी फायनान्स कंपनीच्या कर्जवसुलीच्या कथित तगाद्यामुळे विष प्राशन केले होते.त्याचा दोन दिवसापूर्वी उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.तर तिसर्‍या घटनेत अंजनगाव सुर्जी शहरातील डीपी रोड परिसरात राहणार्‍या मयूर अशोकराव थोरात (वय 28) याने 14 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला.मयूर गेल्या दोन वर्षांपासून पुणे येथे नोकरी करीत होता.दिवाळीनिमित्त तो गावी आला होता.घरी बहीण जावई आले होते,त्याने त्याच दिवशी टोकाचे पाऊल उचलून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.या तीन घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.एकाच तालुक्यात दोन युवा शेतकर्‍यांचा कर्जाच्या विळख्यातून झालेला मृत्यू आणि शहरातील युवकाची आत्महत्या या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून,शेतकर्‍यांच्या आर्थिक परिस्थितीचा आणि कर्जवसुलीच्या पद्धतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Back to top button