दुष्काळ संघर्ष यात्रेवर गुप्तचरांची पाळत
साध्या वेशातील पोलीस अन् गुप्तचर यंत्रणेचे लोक यात्रेत

रविकांत तुपकरांचा गंभीर आरोप
बुलढाणा/15 नोव्हेंबर : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारकडून त्यांचे ‘फोन टॅपिंग’ होत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. यामुळे देशासह महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटले आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सरकारवर पाळतीचा आरोप करून आगीत तेल ओतले आहे. यामुळे राजकारण तापले आहे.
शेतकर्यांच्या प्रश्नांवरून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत दुष्काळ संघर्ष यात्रेवर निघालेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यात्रेच्या पहिल्याच दिवशी सरकारवर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली . आमची दुष्काळ संघर्ष यात्रा चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. साध्या वेशातील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेचे लोक यात्रेत पाठवण्यात आले आहेत.थेट मुंबई, नागपूर आणि बुलढाण्यातील गुप्तचर संघर्ष यात्रेत शामिल झाले आहे.
मात्र, सरकारने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही घाबरणार नाही. शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा हा संघर्ष थांबणार नाही, अशा शब्दांत तुपकरांनी सरकारला थेट आव्हान दिले. काल, चौदा नोव्हेंबर रोजी मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथे यात्रेच्या पहिल्या दिवसातील शेवटच्या सभेत त्यांनी हे गंभीर आरोप केले.
14 नोव्हेंबरला मलकापूर येथून रविकांत तुपकर यांच्या दुष्काळ संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील गावागावांतून ही यात्रा मार्गक्रमण करणार असून, 4 डिसेंबरला बुलढाणा येथे यात्रेचा समारोप आणि एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथे झालेल्या सभेतही नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
यावेळी तुपकरांनी सरकारवर टीका करताना आक्रमक शब्दांत इशारा दिला. कुत्रा दगडाला डसत नाही, दगड ज्या दिशेने आला त्या दिशेने जातो. आमचं पोलिसांशी भांडण नाही. पोलीस आपलेच भाऊ आहेत. मात्र, आमच्या अंगावर पोलीस पाठवणार्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे शब्दात त्यांनी सरकारला ठणकावले . शेतकर्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आमच्या यात्रेत कोण येतंय, कोण जातंय, आम्ही कुठे मुक्काम करतोय, कुणाशी बोलतोय, यावर लक्ष ठेवले जात आहे. साध्या वेशात पोलीस पाठवले आहेत. गुप्तचर यंत्रणेची माणसं आमच्यात फिरत आहेत. पण आम्हाला त्याची चिंता नाही. आमचं आंदोलन उघड आहे. आम्ही शेतकर्यांसाठी लढतोय, कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.दुष्काळ संघर्ष यात्रा 21 दिवस जिल्ह्यात फिरून 4 डिसेंबरला बुलढाण्यात पोहोचणार आहे. 4 डिसेंबरला बुलढाण्यात बळीराजाची ताकद काय असते, हे सरकारला दाखवून देऊ. गावागावांतून शेतकरी बुलढाण्यात पोहोचले पाहिजेत. सरकारला एकच सांगतो, अभी तो शुरुआत है! महाराष्ट्र हादरून सोडला नाही तर शेतकर्याची औलाद सांगणार नाही, असा आक्रमक इशारा त्यांनी दिला





