अयोध्या दर्शनासाठी एसटीची विशेष यात्रा
11 दिवसांचा तीर्थयात्रेचा कार्यक्रम; लालपरी आणि शयनयान बसची सुविधा

अमरावती/ 15 नोव्हेंबर – प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीचे दर्शन घेण्याची इच्छा असलेल्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष तीर्थयात्रेची सुविधा सुरू केली आहे. आता भाविकांना अमरावतीसह राज्यातील विविध बसस्थानकांवरून लालपरी किंवा शयनयान बसने थेट अयोध्येला जाता येणार आहे. यासाठी महामंडळाने 11 दिवसांचा विशेष प्रवास कार्यक्रम तयार केला असून, या यात्रेत जवळपास 10 ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था असेल. लालपरीने प्रवास करण्यासाठी किमान 40 प्रवाशांचा, तर शयनयान बससाठी किमान 30 प्रवाशांचा गट असणे आवश्यक आहे.
प्रत्येक प्रवाशाला 10 लाख रुपयांचे विमा संरक्षणही दिले जाणार आहे. महामंडळासोबत आवश्यक कराराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. अयोध्येसोबतच परिसरातील प्रमुख धार्मिक स्थळांनाही भाविकांना भेट देता येणार आहे. प्रवासाचे भाडे बसने प्रत्यक्ष पार केलेल्या अंतरानुसार ठरवले जाईल. बस आरक्षित करताना अंदाजित भाड्याच्या 20 टक्के रक्कम आगाऊ भरावी लागेल. बसमधील अंतर मोजण्याच्या यंत्राद्वारे प्रवास पूर्ण झाल्यानंतर अंतिम भाडे निश्चित केले जाईल. यात्रेदरम्यान राहण्याचा आणि जेवणाचा खर्च प्रवाशांच्या गटालाच करावा लागेल. तसेच इतर राज्यांतील प्रवासादरम्यान लागणारा प्रवासी कर आणि वाहनतळ शुल्कही गटाने भरायचे आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील आवश्यक परवाने महामंडळाकडून घेतले जातील. प्रशिक्षित चालकांच्या माध्यमातून ही यात्रा पार पडणार आहे. अमरावती विभागाचे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले की, भाविकांनी आवश्यक संख्येने गट तयार करून या सुविधेचा लाभ घ्यावा. अमरावती बसस्थानकाच्या प्रमुख कार्यालयासह अन्य 8 बसस्थानकांवर संपर्क साधून यात्रेची माहिती घेता येईल. भाविकांच्या मागणीनुसार इतर राज्यांतील धार्मिक स्थळांसाठीही अशा सहली आयोजित केल्या जाणार आहेत. खासगी बसच्या तुलनेत परवडणार्या दरात सुरक्षित तीर्थयात्रेची संधी उपलब्ध करून देणे हा महामंडळाचा उद्देश आहे.





