सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाला 1.90 लाखांचे अनुदान

दिव्यांगांसाठी उपयुक्त उपकरणे विकसित करणार

पहिल्या टप्प्यात 1.20 लाखांचा निधी वितरित, दोन वर्षांत संशोधन प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

अमरावती / 15 नोव्हेंबर– शारीरिक दिव्यांग व्यक्तींचे दैनंदिन जीवन अधिक सोपे आणि स्वावलंबी करण्यासाठी उपयुक्त इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकसित करण्याच्या संशोधन प्रकल्पाला सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाला 1 लाख 90 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या संयुक्त सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मंजूर अनुदानापैकी पहिल्या टप्प्यात 1 लाख 20 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतील संशोधनाचा उपयोग सर्वसामान्यांच्या प्रत्यक्ष अडचणी सोडविण्यासाठी व्हावा, या उद्देशाने या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडून केवळ पुस्तकी संशोधनाला प्रोत्साहन न देता प्रत्यक्ष उपयोगी ठरणार्‍या संशोधनाला प्राधान्य दिले जाते. त्याचाच भाग म्हणून सिपना महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार विभागातील प्रा. डॉ. नीलेश कासट, प्रा. डॉ. प्रितेश गुंबळे आणि प्रा. डॉ. प्रफुल्ल गावंडे यांच्या संयुक्त संशोधन प्रस्तावाची निवड करण्यात आली. ’शारीरिक दिव्यांग व्यक्तींसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची रचना आणि निर्मिती’ या विषयावर हा प्रकल्प मंजूर झाला आहे. या संशोधनातून दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन कामे करताना येणार्‍या अडचणी कमी करण्यासाठी आधुनिक उपकरणे विकसित केली जाणार आहेत. या प्रकल्पाचा कालावधी 2 वर्षांचा असून, निर्धारित वेळेत संशोधन पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्य संशोधक आणि सहसंशोधकांवर असेल. या अनुदानाबद्दल संशोधकांनी आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, सदस्य सचिव डॉ. वृषाली कुलकर्णी, सल्लागार डॉ. प्रगती बोकले आणि कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पटेल यांचे आभार मानले. डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, डॉ. अविनाश असनारे, डॉ. अनिता पाटील, डॉ. सुलभा पाटील यांचेही सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Back to top button