35 खासगी ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई
वेलकम पॉईंटवर नितीन मोहड आक्रमक

परिवहन अधिकार्यांना जागेवरच धरले धारेवर
अमरावती/15 नोव्हेंबर – सुट्ट्यांचा गैरफायदा घेत खासगी प्रवासी वाहतूकदारांनी अमरावती ते पुणे मार्गावर तब्बल 4 हजार रुपये तिकीट दर आकारून विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक लूट चालवली आहे. या मनमानी भाडेवाढीविरोधात नितीन मोहड यांनी अमरावतीच्या वेलकम पॉईंटवर आक्रमक आंदोलन छेडले. आंदोलनाची धग वाढताच प्रादेशिक परिवहन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बसेसची कसून तपासणी करत नियम मोडणार्या कुंदन ट्रॅव्हल्सला दंडात्मक नोटीस बजावली. केवळ कागदी कारवाई न करता दोषी बसेस जप्त कराव्यात, अशी आक्रमक मागणी आंदोलकांनी लावून धरल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शिक्षण आणि नोकरीनिमित्त पुणे आणि मुंबईकडे परतणार्या तरुणांची मोठी गर्दी वाढली आहे. याचाच गैरफायदा घेत खासगी बस चालकांनी तिकिटांचे दर नेहमीपेक्षा दुप्पट ते तिप्पट वाढवले आहेत. सामान्य दिवसांत 1000 ते 1500 रुपये असणारे तिकीट थेट 2000 ते 4500 रुपयांपर्यंत नेण्यात आले आहे. विदर्भातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले मोठ्या कष्टाने बाहेरगावी शिकायला जातात. त्यांच्या पालकांच्या कष्टाचा पैसा अशा प्रकारे लुटला जात असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विदर्भ ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहड यांनी आपल्या सहकार्यांसह वेलकम पॉईंटवर ठिय्या मांडला. आंदोलनाची माहिती मिळताच प्रादेशिक परिवहन अधिकारी दळवी आणि जाधव आपल्या पथकासह तिथे पोहोचले. आंदोलकांनी अधिकार्यांसमोरच पुण्याला जाणार्या बसेस थांबवून प्रवाशांची तिकिटे तपासली. यामध्ये कुंदन ट्रॅव्हल्सच्या बसमधील प्रवासी राकेश शिवणकर यांच्याकडून 3650 रुपये, तर गौरव आणि इतर विद्यार्थ्यांकडून 2000 ते 2500 रुपये भाडे घेतल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, या ट्रॅव्हल्सकडे प्रवाशांची अधिकृत यादी आणि दैनंदिन परवाना नसल्याचेही समोर आले.निर्णय आणि नियमांनुसार राज्य परिवहन महामंडळाच्या दरापेक्षा दीडपटीहून अधिक भाडे आकारण्यास मनाई आहे. तसेच या बसेसना केवळ एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी थेट प्रवासी नेण्याची परवानगी असताना शहरात ठिकठिकाणी कार्यालये थाटून बेकायदेशीरपणे तिकीट विक्री सुरू आहे. प्रवासी वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूकही केली जात असल्याचा आरोप नितीन मोहड यांनी केला. जर उद्या अपघात झाला, तर प्रवाशांची नोंदच नसल्याने मोठी अडचण निर्माण होईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दोषी वाहनांवर केलेल्या कारवाईची संपूर्ण आकडेवारी जाहीर करावी आणि अशा बसेस थेट जप्त कराव्यात, असा इशारा नितीन मोहड यांनी दिला. प्रादेशिक परिवहन अधिकारी दळवी यांनी 27 ऑक्टोबरपासून आतापर्यंत 600 वाहनांची तपासणी केल्याचे सांगितले. तसेच ही धडक मोहीम पुढील 10 दिवस अविरत सुरू राहील आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले असले, तरी आगामी नाताळ आणि उन्हाळी सुट्ट्यांत अशी लूट पुन्हा होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.





