सालोरा येथील विहिरीत सापडला वृद्धेचा संशयास्पद मृतदेह
पोलिसांना दिली माहिती; पतीचा खुनाचा गंभीर आरोप

संशयित आरोपी विरुध्द अद्यापही कारवाई नाही
तिवसा/15 नोव्हेंबर – विहिरीत मृतदेह आढळलेल्या वृद्धेचा खून झाल्याचा संशय पतीने व्यक्त केला असून आरोपींच्या अटकेसाठी गावकर्यांनी थेट कुर्हा पोलीस ठाणे गाठले आहे. विशेष म्हणजे संशयिताचे नाव सांगूनही अद्याप कोणतीच कारवाई न झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.तिवसा तालुक्यातील सालोरा येथील रहिवासी असलेल्या 65 वर्षीय गीताबाई हरिभाऊ चव्हाण या 10 नोव्हेंबर रोजी शेतातील विहिरीत मृत अवस्थेत पडून आढळल्या होत्या. या घटनेने संपूर्ण गावात मोठा धक्का बसला होता. सुरुवातीला हा अपघात असावा अशी चर्चा गावात रंगली होती. मात्र आपली पत्नी गीताबाई यांचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून त्यांचा घातपात करून खून करण्यात आला असल्याचा खळबळजनक आरोप पती हरीभाऊ चव्हाण यांनी केला आहे. या गंभीर प्रकारामुळे गावातील वातावरण चांगलेच तापले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. घटनेचा सखोल तपास करून सत्य बाहेर आणावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले कुटुंबीय आणि गावकरी आता आक्रमक भूमिकेत आले असून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाचे गूढ लवकरात लवकर उकलावे यासाठी पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
गावकर्यांचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा
आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पती हरीभाऊ चव्हाण यांच्यासह सालोरा येथील शेकडो गावकर्यांनी कुर्हा पोलीस ठाण्यात हजेरी लावली. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करावा आणि संशयित आरोपीला तात्काळ बेड्या ठोकाव्यात अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. पती हरीभाऊ यांनी पोलिसांना संशयिताचे नाव स्पष्टपणे सांगितले आहे. तरीही संबंधित संशयित आरोपी अद्याप मोकाटच फिरत असल्याने गावकर्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी हलगर्जीपणा न करता या खुनाचा छडा लावावा अशी मागणी आता जोर धरत आहे.





