विकसित भारत संपूर्ण जगाला सुख-शांती देणारा असेल

सरसंघचालक भागवत यांचे प्रतिपादन

छत्रपती संभाजीनगर/25 नोव्हेंबर  -समाजात आज सगळे काही बिघडत चालले आहे, असा नकारात्मक विचार अनेकदा केला जातो; मात्र समाजात गडबड करणार्‍या लोकांपेक्षा कोणतीही अपेक्षा न ठेवता निःस्वार्थपणे सेवा करणारे लोक 40 पटींनी अधिक आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर येथे ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीने आयोजित 5 व्या ’पद्म फेस्टिव्हल’च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याची आणि तो सांभाळण्याची मोठी जबाबदारी आजच्या युवा पिढीवर आहे. जगातील काही महासत्ता इतरांना दाबून स्वतःचा स्वार्थ साधतात; परंतु भारत सामर्थ्यवान झाल्यावर दुर्बलांचे रक्षण करेल आणि संपूर्ण जगाला सुख-शांतीचा नवा मार्ग दाखवेल, असा विश्वासही डॉ. भागवत यांनी यावेळी व्यक्त केला. समाजातील सकारात्मक शक्ती आणि प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणार्‍या ’अनसंग हीरो’चे (पडद्यामागील नायक) महत्त्व विशद करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी 14 वर्षांपूर्वीचा एक प्रसंग सांगितला. 14 वर्षांपूर्वी एका अत्यंत श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तीची भेट घेतली असता, संघाचे एवढे मोठे सेवा प्रकल्प कसे चालतात आणि निधी कोठून येतो, असा प्रश्न त्यांनीविचारला. त्यावर, आमचा स्वयंसेवक समाजात दुःख दिसले की माझ्याकडे साधने आहेत का याचा विचार न करता काम सुरू करतो आणि बाकी सर्व आपोआप उभे राहते, असे मी सांगितले.

Back to top button