निवडणूक आयुक्तांचा राजीनामा हाच नागपूरमध्येही अजेंडा
संविधान दिनी पुन्हा नवी रणनीती

अभिजीत दिपके यांचा दावा
छत्रपती संभाजीनगर /25 नोव्हेंबर : 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये पुन्हा एकदा निवडणूक आयुक्तांचा राजीनामा घेण्याचा आग्रह कायम आहे. ती आमची मागणी कायम आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून अपेक्षा वाढल्या आहेत. पण आम्ही आमची मागणी ‘कॉम्प्रोमाईज’ केली नाही, असे स्पष्टीकरण अभिजीत दिपके यांनी दिले. सौरव दास यांची अडवणूक झाल्यानंतर निषेध नोंदविण्यासाठी तसेच भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत दिपके बोलत होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे यश जाणून घेण्यासाठी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये व्याख्यान द्यायला जायचे होते. पण सरकारने ऐन वेळी पारपत्रातील नोंदीवर त्याला जाणीवपूर्वक अडवून धरले.त्याची चूक काय होती तर त्याने विजय मल्या, मेहुल चोक्सी, निरव मोदी यांच्याप्रमाणे त्याने कोणताही बँक घोटाळा नव्हता, ही त्याची चूक होती. तशी चूक केली असती तर सौरव दास यालाही अडवून न ठेवता सोडले असते, अशी तिरकस टीका अभिजीत दिपके यांनी केली. सौरव दास दिल्ली येथे जाऊन महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून उभा करण्यात आलेल्या आंदोलनाबाबतच बोलला असता, असे सांगत दिपके यांनी सरकार घाबरून हे सारे घडवून आणत असल्याचा दावा केला. सौरव दास यांचे पारपत्र याच सरकारने दिले. या पूर्वीही तो दोन वेळा विदेशात जाऊन आला आहे. जर पासपोर्टमध्ये चूक असेल तर ती तेव्हा कशी दिसली नाही. जगभरात आंदोलनामुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतरच सरकारला नोटीस द्यावीशी का वाटली, सरकार एवढे का घाबरले आहे का, असा प्रश्नही दिपके यांनी उपस्थित केला. निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत नवे आंदोलन उभे करणार्या कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्ते काहीसे मागे फेकेले गेले का, असा प्रश्न विचारला असता, कोणतेही मोठे आंदोलन उभे करण्यासाठी वेळ लागतो. तो वेळ घेतला जात आहे. हा लढा लांबपल्ल्याचा आहे. संविधान दिनी पुन्हा एकदा ज्ञानेशकुमारचा मुद्दा नागपूरमध्ये उचलला जाईल असे दिपके म्हणाले.





