रखडलेल्या उड्डाणपुलाविरोधात काँग्रेसचे मशाल आंदोलन

उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची आग्रही मागणी

प्रशासनाला अमरावती शहर बंद पाडण्याचा थेट इशारा

अमरावती/25 नोव्हेंबर – मागील दीड ते 2 वर्षांपासून रखडलेल्या रेल्वे स्थानक चौक ते राजकमल चौक उड्डाणपुलाच्या कामाविरोधात अमरावती शहर जिल्हा काँग्रेस समितीने आज सायंकाळी आक्रमक मशाल आंदोलन केले. दररोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या अमरावतीकरांच्या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निषेध मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. उड्डाणपुलाचे अर्धवट काम तातडीने पूर्ण न केल्यास संपूर्ण अमरावती शहर बंद पाडण्याचा थेट इशारा यावेळी काँग्रेसने प्रशासनाला दिला. शहराच्या मध्यवर्ती भागातील रेल्वे स्थानक चौक ते राजकमल चौक दरम्यान उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या दीड ते 2 वर्षांपासून अतिशय संथ गतीने सुरू आहे. या रखडलेल्या कामामुळे शहरातील वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला असूननागरिकांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कामाच्या या दिरंगाईविरोधात आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी अमरावती शहर जिल्हा काँग्रेस समितीने आज सायंकाळी मशाली पेटवून निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या आंदोलनात माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात पेटत्या मशाली घेऊन कार्यकर्त्यांनी प्रशासन आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. उड्डाणपुलाच्या कामात होणारा विलंब आता अजिबात खपवून घेतला जाणार नसल्याचा पवित्रा नेत्यांनी घेतला. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन उर्वरित बांधकाम तात्काळ सुरू करावे आणि लवकरात लवकर पूर्ण करावे. अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडून संपूर्ण अमरावती शहर बंद पाडले जाईल असा निर्वाणीचा इशारा काँग्रेस पदाधिकार्‍यांनी यावेळी दिला. सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असेही आंदोलकांनी ठणकावून सांगितले.
उड्डाणपूल पूर्ण करा हीच मागणी-रेल्वे स्थानक चौक ते राजकमल चौक उड्डाणपूल दीड ते 2 वर्षांपासून रखडला आहे. रोज वाहतूक कोंडी वाढत आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत. काम तातडीने पूर्ण करावे हीच काँग्रेसची मागणी आहे. दिरंगाई झाल्यास शहर बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. उड्डाणपूल पूर्ण झाल्यास वाहतूक सुरळीत होईल. नागरिकांना दिलासा मिळेल. हाच आंदोलनाचा उद्देश आहे.

Back to top button