रक्ताचा तुटवडा वाढला, रक्तपेढ्यांमध्ये साठा संपला
रक्तदान शिबिरांची संख्या घटली, रुग्णांच्या उपचारांसाठी रक्त मिळवताना अडचणी

अमरावती /25 नोव्हेंबर – जिल्ह्यात रक्ताची मागणी वाढत असताना रक्तदान शिबिरांचे आयोजन घटल्याने शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा संपला असून काही ठिकाणी मोजक्याच रक्तपिशव्या शिल्लक आहेत. अपघातग्रस्त, गंभीर आजारी, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण, गरोदर महिला तसेच सिकलसेल आणि थॅलेसेमिया रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची उपलब्धता कमी झाल्याने रुग्णांच्या उपचारांवर ताण वाढत आहे. धरणी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत सर्वाधिक 18 रक्तपिशव्या उपलब्ध होत्या. संत गाडगेबाबा रक्तपेढीत 3, तर इर्विन रुग्णालयात केवळ 1 रक्तपिशवी शिल्लक होती. पीडीएमसी, जय मातादी, डॉ. बर्मा ट्रस्ट, परतवाडा, गोडे रक्तपेढी, बालाजी आणि वरूड येथील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा शून्य नोंदविण्यात आला. रक्तदान शिबिरांची संख्या घटल्याने रक्तसंकलनावर परिणाम झाला असून, दुसरीकडे रुग्णालयांमध्ये रक्ताची मागणी कायम आहे. जिल्ह्यात 2 शासकीय आणि 7 खासगी रक्तपेढ्या कार्यरत असून, 24 शासकीय व जवळपास 150 खासगी रुग्णालयांत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रक्ताचा तुटवडा लक्षात घेता नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रक्तपेढीचे प्रमुख डॉ. आशीष वाघमारे यांनी केले आहे.





