मार्च अखेरपर्यंत शहरवासीयांना मुबलक पाणी मिळणार
अप्पर वर्धा धरणातील जलसाठ्याचे काटेकोर नियोजन, पाणी जपून वापरण्याचे आ.खोडकेंचे आवाहन

अमरावती/25 नोव्हेंबर – अप्पर वर्धा धरणात 226.44 दलघमी पाणीसाठा शिल्लक असल्याने मार्च 2027 अखेरपर्यंत अमरावती शहराला पाणी कपातीची झळ बसणार नाही. आ. सुलभा खोडके यांनी आढावा बैठकीत पाणी नियोजनाचा आराखडा तपासला. पिण्याचे पाणी राखीव ठेवण्यासोबतच शहरातील तलावांचे पुनरुज्जीवन करून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शासनाने 5 ऑगस्ट 2026 रोजी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर आ. सुलभा खोडके यांनी 25 नोव्हेंबर 2026 रोजी सिंचन सेवा भवन येथे पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. अप्पर वर्धा धरणात सध्या 40.15 टक्के उपयुक्त साठा असून तो मार्च 2027 पर्यंत शहराला पुरेसा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. पिण्याच्या पाण्याची खात्री झाल्याशिवाय सिंचन व उद्योगांना पाणी आरक्षित केले जाणार नाही. धरणातील साठा आणि शहराची रोजची मागणी लक्षात घेऊन नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्याच्या सूचना आ. खोडके यांनी अधिकार्यांना दिल्या.शहरातील वडाळी आणि छत्री तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्यावरही बैठकीत चर्चा झाली. या नैसर्गिक व कृत्रिम तलावांचे पुनरुज्जीवन केल्यास भविष्यात आसपासच्या भागाला मोठा आधार मिळेल, त्यामुळे याचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश आ. खोडके यांनी दिले. उन्हाळ्याची चाहूल लक्षात घेता अनावश्यक कामांसाठी पिण्याचे पाणी वाया घालवू नये, असे आवाहनही त्यांनी शहरवासीयांना केले. या बैठकीस आ. संजय खोडके, यश खोडके, मुख्य अभियंता श्रीराम हजारे, अधीक्षक अभियंता मनीष राजभोग, कार्यकारी अभियंता श्रीकांत उमप, उपविभागीय अभियंता संजय लेवरकर, मनोज वाकेकर, सभापती अविनाश मार्डीकर, जलतज्ज्ञ रमेश ढवळे, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण, प्रकल्प अभियंता राजेश आगरकर, माजी महापौर ड. किशोर शेळके, प्रशांत डवरे, नगरसेवक मनीष बजाज, रतन डेंडूले, प्रमोद महल्ले, गुड्डू धर्माळे, जितेंद्रसिंह ठाकूर, मनीष देशमुख, आनंद मिश्रा, भास्कर ढेवले, नरसिंह यादव, मनीष पाटील, संदीप ढोबळे आदी उपस्थित होते.पाणी नियोजनासाठी यंत्रणांनी सूक्ष्म आराखडा करावा -अप्पर वर्धा धरणातील बाष्पीभवनामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र उन्हाळ्यापर्यंत पाणी टंचाई भासणार नसल्याचे आ. संजय खोडके यांनी स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्यालाच सर्वोच्च प्राधान्य देऊन मार्च 2027 नंतरच्या शिल्लक साठ्याचा आढावा घेत पुढील उपाययोजना आखाव्यात. शहराच्या सर्व भागात सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सूक्ष्म नियोजन करावे व एल-निनोच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही पाण्याची बचत करावी, असे आवाहन त्यांनी केले.





